शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

थर्ड आय : .. आणि ती २१ वर्षानी रडली!


३ एप्रिल १९८८! शरयूच्या पोटी एका गोंडस बाळानं जन्म घेतला. जन्मत:च हसरा चेहरा आणि ते सशासारखं गोंडस रूप पाहून नागेश आणि शरयू घाडींचा आनंद गगनात मावेना. पण काही दिवसांतच असं लक्षात आलं की, देव या गोंडस बाळाला ‘पाठीचा कणा’च द्यायला विसरलाय. पण शरयू-नागेशनं देवाची ही चूक तशीच स्वीकारली आणि विधात्याने दिलेला हा ‘प्रसाद’ आहे असं मानून या बाळाला तेच नाव दिलं- प्रसाद! प्रसाद नागेश घाडी!!

या रविवारी ६ सप्टेंबरला ‘नक्षत्राचे देणे’मधल्या ‘आता खेळा नाचा’ या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं झी मराठी चॅनलवर पुन:प्रक्षेपण झालं. व्हील चेअरमध्ये स्वत:च्या शरीराचं मुटकुळं करून बसलेला ‘प्रसाद घाडी’ गात होता- कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा! सहा वर्षानी पुन्हा एकदा खूप रसिकांनी प्रसादच्या घरी कौतुकाचे फोन केले. त्या संध्याकाळी/रात्री त्याचा फोन सतत बिझी होता आणि त्याच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. डोळे भरून आले, पण तिने हसतमुखाने ते अश्रू ढळू दिले नाहीत.
‘
सारेगमप लिटील चॅम्प’सारखा सुंदर कार्यक्रम सादर केल्यावर आणि यशस्वी केल्यावरही इतक्या वर्षानी आपल्या मुलाचा सहभाग असलेला कार्यक्रम नेमका आज पुन:प्रक्षेपित का करीत असतील? खरं तर त्याच दिवशी दुसऱ्या एका चॅनलवर ‘पाटी फुटली’ हा तसाच लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम सादर होत होता. कदाचित दोन चॅनल्समधील व्यावसायिक स्पर्धेमुळे त्याच दिवशी, त्याच वेळी ‘आता खेळा नाचा’ पुन:प्रक्षेपित केलं असेल, त्यात वेगळं काय? पण तरीही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रसादही डोळे भरून तो आपलाच जुना कार्यक्रम बघत होता आणि रसिकांचे कौतुकाचे फोन स्वीकारत होता.
‘
देव त्याला ‘कणा’ द्यायला विसरला आणि प्रसादला जन्मत:च रस्र््रल्लं’ ट४२ू४’ं१ अ३१स्र्ँ८ या असाध्य बाधीनं जखडलं. कुठलीही शारीरिक हालचाल करायची असली तरी त्याच्या दुसऱ्याच्या आधाराची गरज भासायची. ताठ मानेनं बसण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या काखेत हात घालून, त्याच्या शरीराची वर-खाली हालचाल करून पाठीचे मणके एकात एक घट्ट बसले आहेत याची खात्री करून, पाठीचा कणा ताठ करून मगच त्याला बसवावं लागायचं. पण आहे त्या व्याधीवर मात करून आसवं गाळत न बसता, आयुष्य सुंदरपणे जगायची उमेद त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यात निर्माण केली.
विधात्यानं जरी त्याच्या नशिबात असं दुसऱ्याच्या मदतीनंच जगायचं आयुष्य दिलं असलं तरी त्याचे आभारच मानायला हवेत, अशी शिकवण त्याची आई शरयू त्याला देत राहिली. त्याला श्लोक, अथर्वशीर्ष, रामरक्षा शिकवत राहिली. लहानपणापासून गणपतीच्या आरत्या, बडबड गीतं म्हणताना, त्याचा आवाज गोड आहे याची जाणीव होऊ लागली. मग या छोटय़ाशा जीवाला गाण्यासाठी दीर्घ श्वास मिळावा म्हणून कोणीतरी मेणबत्ती पेटवून ती फुंकरेने विझवायचा व्यायाम सुचवला. फुंकरेने ज्योत विझवायच्या व्यायामाबरोबरच प्रसादच्या आई-वडिलांनी त्याला आपल्या दु:खावरच फुंकर मारायला शिकवलं.
प्रसादची आई शरयू, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका, तर वडील नागेश नायर हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक! सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात असते तशी बेताचीच परिस्थिती. प्रसादच्या या अवस्थेला तो स्वत: जबाबदार नाही, मग जीवनाच्या आनंदापासून वंचित राहायची शिक्षा त्याने का भोगायची? असा विचार त्याच्या जन्मदात्यांनी केला. मग दोघांनी हे ‘दैवी चॅलेन्ज’ स्वीकारलं.
प्रसाद अपंगांच्या शाळेत जाऊ लागला. त्याला सतत कोणाच्या तरी आधाराची गरज भासत असे म्हणून नागेश दिवसभर त्याला साथ देऊन, रात्रपाळीची सुरक्षा रक्षकाची नोकरी करू लागले. शरयूनं त्याच्यातल्या उपजत कलेला, चित्रकलेला आणि गाण्याला प्रश्नेत्साहन दिलं. प्रदीप जोशींकडे तो शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागला. चौपाटी समोरच्या बालभवनमध्ये चित्रकलांच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. चित्र काढता काढता, गाणी गाता गाता, छोटय़ा-छोटय़ा कविता करता करता, त्याच्या शिक्षिका आईने, त्याच्यात ‘ऐकण्याची आवड’ निर्माण केली. हातात पुस्तक धरून सलग वाचता येत नाही म्हणून त्याची आई त्याला अभ्यासाची व इतर अवांतर पुस्तके वाचून दाखवत होती. अभ्यासाबरोबरच तो स्वामी, श्रीमानयोगी, शिवचरित्र यासारखं पुस्तके ऐकत बसत असे. त्याच्या या सर्व कलागुणांची दखल घेतली गेली आणि प्रसादला २०००-२००१चा ‘बालश्री’ हा ‘राष्ट्रपती पुरस्कार’ मिळाला.
सातवीपर्यंत अपंगांच्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाने, आता ती शाळा सोडून ‘सर्वसामान्यांच्या’ बरोबरीनं शिकण्या-जगण्याचा आनंद अनुभवावा अशी त्याच्या जन्मदात्यांची इच्छा होती. जिद्द आणि प्रबल इच्छेच्या जोरावर त्याने सर्वसामान्यांच्या शाळेत प्रवेश मिळवला. सलग दोन - तीन तास हातात पेन्सिल धरू न शकणाऱ्या प्रसादने लेखनिकाच्या मदतीने दहावी शालांत परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. पण सातवीनंतर अपंगांची शाळा सोडल्यावर, त्याने तोपर्यंत पटकावलेली अनेक बक्षिसे मात्र त्याच्या शाळेने त्याला दिली नाहीत. पण ते दु:ख त्याने सहज पचवलं आणि त्याच वर्षी २००३ मध्ये तो सर्व बालगायकांबरोबर ‘नक्षत्रांचे देणे’ मध्ये सहभागी झाला. केवळ दोन गाणी गाऊन हा ‘लिटल चॅम्प’ अनेक रसिकांच्या मनात जाऊन बसला. या कार्यक्रमानंतर मी ‘चतुरा’ मासिकात प्रसादवर लिहिलेला ‘जिद्दीचे गाणे’ हा लेख वाचून वाचकांकडून आलेला प्रचंड प्रतिसाद पाहून प्रसाद खूष झाला होता.
त्याच्या मनाची उमेद अशी वाढत असताना नियतीने त्याची शारीरिक असहाय्यता वाढवायला सुरुवात केली; आणि शालांत परीक्षेत ८६% गुण मिळवूनसुद्धा पुढे शिक्षण न घेता गाणी गात, चित्र काढत पुढील आयुष्याचा, उर्वरित आयुष्याचा आनंद उपभोगायचा निर्णय त्याने घेतला. एक उत्तम गायक व्हावं, स्वत:ची कंपोझिशन्स बांधावीत हे त्याचं स्वप्न होतं. मग प्रसादला स्वत: एकटय़ाने गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम करावा असं वाटू लागलं, अडचण होती ती फक्त त्याच्या सलग दोन-तीन तास बसण्याची! पण संगीतकार कौशल इनामदारच्या साथीने त्याने ते साध्य केलं आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विजय देसाईंमुळे, प्रसादच्या एकटय़ाच्या गाण्याचा ‘जिद्दीचे गाणे’ हा सलग तीन तासांचा कार्यक्रम सादर झाला. झी मराठीने त्याच कार्यक्रमात ‘आता खेळा नाचा’ ही नक्षत्रांचे देणे मालिकेतली डीव्हीडी रिलीज केली. झीच्या कार्यक्रमामुळे आणि चतुरातल्या त्या लेखानंतर प्रसाद जगभरात असंख्य रसिकांच्या मनात जाऊन बसला.
लहानपणी इतिहासाच्या अभ्यासातल्या गडांची प्रत्यक्ष माहिती व्हावी. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला खांद्यावर बसवून ‘प्रतापगड’सुद्धा चढून पार केला. केसरी ट्रॅव्हल्सच्या विशेष सहकार्याने बेंगलोर, म्हैसूरला नेऊन निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची प्रत्यक्ष ओळख करून दिली आणि त्यानंतर मात्र षोडषवर्षीय प्रसादने आपल्या गाण्याच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर, दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचं सन्माननीय आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या आई-वडिलांनाही परदेशवारीचा आनंद उपभोगू दिला.
हळूहळू प्रसादचं वय वाढत होतं. तो वयात यायला लागला होता. पण शरीर मात्र झिजू लागलं होतं. स्नायूंचाच आजार, त्यामुळे ते हळूहळू क्षीण होऊ लागलं होतं. शरीराची हालचाल मंदावू लागली, अनेक बंधनं आडवी येऊ लागली पण देवानं दिलेला हा ‘प्रसाद’ म्हणजे आनंदच असा मनाशी पक्का निश्चय केलेले जन्मदाते आणि स्वत:ची जिद्द या जोरावर त्याचा दिनक्रम चालूच राहिला. जगातलं उत्तमोत्तम वाचन, आईच्या मुखातून ऐकणं चालूच राहिलं. शरीर साथ देत नसताना, जन्मत:च एका असाध्य व्याधीनं जखडलं असतानाही, घडत राहिलेल्या कलेच्या साधनेमुळे रु. ५०,००० चा मानाचा ‘नॅशनल अ‍ॅबिलिटी’ पुरस्कारही पटकावला.
प्रसादच्या या खडतर प्रवासात घाडी कुटुंबीयांना जसे भले अनुभव आले तसेच अनेक बुरे अनुभवही निश्चितच आले. प्रसादच्या कलागुणांनी आणि शरयू नागेशच्या हसतहसत दु:ख स्वीकारण्याच्या जिद्दीने प्रभावित होऊन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्याआधीच्या राष्ट्रपतींनी सन्मान केलेल्या या ‘बालश्री’ला पुन्हा एकदा भेटीसाठी निमंत्रण पाठवलं. त्याच्या एका चित्राचा स्वीकार केला. मात्र सर्वसामान्यांच्या आणि आप्तेष्टांच्या काही स्नेहसंमेलनांपासून मात्र शरयू वंचित राहिली. डोहाळजेवण, बारसं, वाढदिवस अशा काही कार्यक्रमांना काही लोक, तिला टाळू लागले, पण ती नाऊमेद झाली नाही. आपलं दु:ख पचवायला तिने वेळप्रसंगी कलेची आराधना केली. वयाची चाळिशी उलटली तरी कथ्थक नृत्याचे धडे घेत तिने आपलं दु:ख नजरेआड केलं. दिवसभर घरात मुलाची सेवा आणि सलग १८ वर्षे रोज रात्री सुरक्षा रक्षकाची चाकरी सांभाळणाऱ्या नागेशने, बाहेरची दुनिया बघायला मजा अनुभवायला मिळत नाही म्हणून, मौजेचा- स्वानंदाचा ‘वाम मार्ग’ स्वीकारून स्वत:चं आयुष्य बरबाद केले नाही, उलट दिवसभर मुलाची सेवा करता करता, घरातच फावल्या वेळात पाळीव माश्यांची देखभाल करण्याचा छंद जोपासला.
प्रसादासाठी जसे त्याने आई-वडील बऱ्याच गोष्टी ‘अ‍ॅडजेस्ट’ करून जीवनाचा आनंद एकत्रितपणे मिळवत होते; तसाच ‘प्रसाद’सुद्धा आपल्याला मदत करणाऱ्यांची, आई-वडिलांची धडपड बघून, स्वत:ला ‘अ‍ॅडजेस्ट’ करू लागला. अनेक इच्छा आकांक्षांना तो मुरड घालू लागला. पण तरीही चुकूनमाकून त्याच्या तोंडून एखादी इच्छा बोलून गेली तरी शरयू-नागेश त्याचा शब्द खाली पडू देत नसत. आणि नशिबही त्याला साथ देत असे. एकदा त्याच्या तोंडून पंचतारांकित ताजमहाल हॉटेल बघायची इच्छा, नकळत व्यक्त झाली. शरयूने कितीही खर्च झाला तरी, प्रसादला तिथे नेण्याचा चंग बांधला, परंतु नशिबानं त्या आधीच त्याला साथ दिली.
काही महिन्यांपूर्वीच प्रसादला ‘डॉ. बात्रा पॉझिटिव्ह हेल्थ’ पुरस्कार जाहीर झाला आणि योगायोगानं त्याचा वितरण समारंभ ताजमहाल हॉटेलमध्येच होता. प्रसादची तब्येत दिवसेंदिवस खालावली होती, पण तरीही आयोजकांच्या सहकार्याने प्रसाद ताजमहाल हॉटेलमध्ये पोहोचला. मृत्युशी झुंज देणाऱ्या प्रसादने, स्ट्रेचरवरच तो पुरस्कार स्वीकारला आणि स्ट्रेचरवरूनच त्याने शेवटचं गाणं तिथे सादर केलं, ‘ये कागजकी कश्ती..’
शुक्रवारी चार सप्टेंबरला प्रसादला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं गेलं. पण तो लगेच रविवारी घरी परतला. योगायोगानं त्याच संध्याकाळी झी मराठीने नक्षत्रांचे देणे पुन:प्रक्षेपित केलं. प्रसादने रसिकांचे कौतुकाचे फोन स्वीकारले. आणि शरयूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रसादला पुन्हा सोमवारी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायची पाळी आली. डॉक्टरांनी कउव मध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. प्रसादला मात्र ते नको होतं. त्याला शांतता हवी होती, पण त्याने आई-वडिलांचं ऐकलं. त्यांच्यासाठी त्याने स्वत:ला कउव मध्ये अ‍ॅडजेस्ट केलं. २१ वर्षाच्या प्रसादनं मंगळवारी सकाळी आईला विचारलं, ‘आई, मी आजपर्यंत सगळं अ‍ॅडजेस्ट केलं ना?’ शरयूच्या उत्तरासाठी तो थांबला नाही. ज्या विधात्याने २१ वर्षापूर्वी शरयू पोटी या ‘प्रसाद’ला पदरात ठेवलं, त्याच विधात्याने ऐन अंगारकीच्या दिवशी शरयूकडून ‘प्रसाद’ परत घेतला. ती कोलमडली. आयुष्यभर अनेक प्रसंगांनी डोळ्यात पाणी तरळलं, पण तिनं कधी अश्रू ढळू दिले नाहीत. पण आज मात्र.. ती २१ वर्षानी रडली!

संजय पेठे , sanjaypethe@yahoo.com


आम्ही आम आदमीचे ‘शिपाई’! - सुनील चावके


आम्ही आहोत या देशातील कोटय़वधी ‘आमआदमी’चे शिपाई. देशाला स्वातंत्र्य लाभून ६२ वर्षे लोटले तरी बेरोजगारी, उपासमारी, पिण्याचे शुद्ध पाणी, निवारा, शिक्षण व आरोग्य सुविधांच्या अभावी जनता वंचित व उपेक्षित आहे. जनतेच्या उत्थानाचा नुसता विचार करण्यासाठीच आम्हाला किती मानसिक, बौद्धिक, शारीरिक कष्ट उपसावे लागतात याचा नेमका व खरा अंदाज कुणालाच येऊ शकणार नाही.

दिल्लीत दीड-दोन एकरांच्या प्रशस्त बंगल्यात राहिल्याशिवाय आम्ही शंभर-दीडशे चौरस फुटांमधील निवाऱ्यासाठी धडपडणाऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही. अंधारात चाचपडणाऱ्यांच्या समस्यांची चर्चा करताना आम्हाला अखंड वीजपुरवठा आणि भरदिवसा दिव्यांचा लखलखाट लागतो. दालनात एअर कंडिशनरचा गारठा नसेल तर उन्हातान्हात राबणाऱ्यांच्या भल्याचे धोरण आखताना आमचे डोकेच काम करीत नाही. उपासमारीने गांजलेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन कण कसे पडतील, हे आम्हाला पंचतारांकित हॉटेलातील काँटिनेंटल पंचपक्वानांचा आस्वाद घेतल्याशिवाय सुचतच नाहीत. गढूळ आणि दूषित पाणी पिऊन तहान भागविणाऱ्यांची चिंता करताना आमच्या घशाला पडलेली कोरड मिनरल वॉटर किंवा कोल्ड ड्रिंक्सनेच शमते. मैलोन्मैल पायपीट करणाऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी रस्त्यांवर फिरताना आम्हाला सर्वसुविधांनी सज्ज एअर कंडिशन्ड एसयुव्हीच लागते. जनतेच्या भल्याची चिंता करण्यातच एवढा वेळ जातो की पायी चालण्याचा आनंद आमच्या वाटय़ाला येतच नाही. गरीब, उपेक्षित व वंचितांची दिवसरात्र चिंता करून हृदयविकार, हायपरटेंशन, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा बळावल्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे नाइलाजाने आम्हाला वातानुकूलित गाडी सोबत ठेवून मॉर्निंग किंवा इव्हनिंग वॉक करणे भाग पडते. सायकल, सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, बसगाडय़ा, रेल्वेगाडय़ांनी प्रवास करून सर्वसामान्यांना होणाऱ्या दैनंदिन दगदगीचे स्वरूप समजून घेणे आम्हाला शक्यच नाही. एवढेच काय, विमानात पाठीमागे बसलेल्या ‘आम आदमी’ला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, याची कल्पना आम्ही केवळ बिझनेस क्लासमध्ये बसूनच करू शकतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची गुंतागुंत वाढून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले की त्यावर श्ॉम्पेन, व्होडका, वाईन आणि अन्य ‘विरंगुळ्या’च्या डिप्लोमसीशिवाय तोडगाच निघू शकत नाही. काय करणार? आमच्या ‘सेवे’चे स्वरूपच असे आहे की सतत कार्यमग्न राहण्यासाठी आवश्यक असलेली ही जीवनशैली स्वीकारली नाही तर उच्च विचारांची प्रेरणा लाभून जनतेची जी सेवा आमच्या हातून घडायला हवी ती घडणारच नाही. एवढय़ा तरी सुविधा आहेत म्हणूनच आम्हाला रोज १६ ते १८ तास काम करणे शक्य होते. या तुटपुंज्या सुविधांविषयी कधीही ब्र न काढता आम्ही दशकानुदशके आणि पिढ्यान्पिढय़ा पूर्ण ‘क्षमते’ने काम करू शकलो तेव्हा कुठे भारताला आर्थिक महाशक्ती म्हणून अमेरिका, चीनसह युरोपातील बलाढय़ देशांना आव्हान देणे शक्य झाले. आम्हाला दिल्लीत कोणकोणत्या विवंचनांना सामोरे जावे लागते याची ‘आम आदमी’ला जाणीव नसेल तर ते एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ज्यांच्या ‘साक्षी’ने आम्ही हे त्यागाचे अग्निहोत्र प्रज्वलित केले त्यांनाच आमच्या या जीवनशैलीचा तिटकारा यावा हे म्हणजे अतीच झाले. आमचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ‘नंबर टू’ प्रणवदा यांच्याप्रमाणे गरिबी काय असते हे आम्हालाही ठाऊक आहे. पण गरिबी ही ऑलिम्पिक मेडलसारखी मिरवायची गोष्ट नसते, हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. गरिबीवर मात करताना प्रारंभी केलेल्या जनसंग्रहाचे बघता बघता धनसंग्रहात रूपांतर करून सातासमुद्रापलीकडच्या स्विस बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी लागणारे कसब व धाडस त्यांच्यात नसावेच. म्हणूनच साध्या राहणीचा फाजील सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. दारिद्रय़ निर्मूलनाचा आम्हालाच फस्र्ट हँड अनुभव नसेल तर ११० कोटी लोकसंख्येच्या भारताचे श्रीमंत आणि समृद्ध देशांच्या पंक्तीत बसण्याचे स्वप्न कधीच साध्य होणार नाही. गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून अख्खे आयुष्य ओढगस्तीत आणि काटकसरीतच काढायचे, असे कोणत्याही तत्त्ववेत्याने सांगितलेले नाही. सरसंघचालकांनी कितीही कानपिचक्या दिल्या तरी भाजपचा एकही नेता असला काटकसरीचा सल्ला मान्य करणार नाही. वैंकय्या नायडूंनी भाजपच्या वतीने तशा भावनाही व्यक्त केल्या आहेत. गरिबीला ग्लॅमर मिळवून देणारे आमचे कम्युनिस्ट सहकारीही असल्या युक्तिवादाशी ‘हातचे राखून’च सहमत होतील. मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडून छोटय़ाशा घरात राहणाऱ्या बुद्धदेव भट्टाचार्यानाही ते फार भाव देत नाहीत. त्यांनादेखील धूर काढत गरिबांचा विचार करायला ट्रिपल फाइव्ह किंवा बेन्सन अँड हेजेसच लागते. परदेशात गेल्यावर पंचवीस हजारापेक्षा कमी किंमतीचा शर्ट खरेदी करणे कॉम्रेडांनाही कमीपणाचे वाटते. हा सारा अंगीभूत साधेपणा त्यांनी आपल्या संसदीय आणि वैचारिक मेहनतीचे मोल पक्षाच्या खजिन्यात जमा करून टिकवून ठेवला आहे. धूर काढायला आणि शॉपिंग करायला पैसा कुठून आला, असे कुणी त्यांना विचारत नाही.
सर्वसामान्यांविषयी वाटणारी तळमळ आणि आत्मीयतेपोटी आमचे अनेक सहकारी मंत्री सरकारची एक दमडीही न स्वीकारता ‘निरपेक्ष’ भावनेने देशापुढचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. मतदारांना खूष करण्यासाठी पदरचे कोटय़वधी रुपये उधळून लोकसभेवर निवडून यायची आम्हाला हौसच आहे. सार्वजनिक जीवनात पैशाचा खूपच अतिरेक केला तर राजू शेट्टींसारखे कफल्लक किंवा रामविलास पासवान यांना पराभूत करणारे रामसुंदर दास यांच्यासारखे नव्वदीला टेकलेले वृद्ध निवडून येतात. पण असल्या अपवादांमुळे आमच्या उत्साहावर विरजण पडत नाही.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा स्वातंत्र्यपूर्व काळातील मंत्र होता. आता ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे उच्च विचारसरणीसाठी उच्च दर्जाची राहणी अनिवार्य बनली आहे, हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींसारख्या हौशी राजकीय नेत्यांना कसे कळणार? ७, रेसकोर्सशेजारी सरकारी बंगला मिळूनही परराष्ट्र मंत्री कृष्णांना त्यात कधी राहावेसे वाटले नाही तर त्यांचा काय दोष? साध्या राहणीवर कमालीचा विश्वास असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्तींचे ते मित्र आहेत. त्यामुळे साधेपणाने कसे जगायचे हे खरे तर त्यांना प्रणवदांनी सांगायची आवश्यकताच नाही. इन्फोसिससारखी ग्लोबल कंपनी स्थापन करूनही नारायणमूर्ती आपल्या कार्यालयात सायकलने जायचे किंवा स्वत स्वच्छतागृहाची निगा राखायचे. पण याचा अर्थ कृष्णांनीही त्यांचे अनुकरण करावे, असा होत नाही. पंतप्रधानांच्या शेजारच्या बंगल्यात राहण्यात कृष्णांना जसे स्वारस्य वाटले नाही तसेच नारायणमूर्तींच्या साधेपणावरही ते भाळले नाहीत. कृष्णा सर्व ऐहिक गोष्टींच्या पलीकडे गेले असल्याचीच त्यातून साक्ष पटते. अशा व्यक्तीला प्रणवदांनी पिच्छा पुरवून मौर्य शेरेटनच्या स्युईटमधून बाहेर पडण्यास भाग पाडावे, हे काही बरोबर नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असताना ते कसे जगत होते, याकडे काँग्रेसच्या नेत्यांचे यापूर्वी का लक्ष गेले नाही? यंदा कर्नाटकातून लोकसभेवर निवडून आलेल्या बहुतांश खासदारांना आपल्या निवडणुकीवर पाच ते दहा कोटी रुपये खर्च करावे लागले. कृष्णा मात्र एक पैसा खर्च न करता राज्यसभेवर निवडून आले आहेत. दिल्लीत शंभर दिवसांच्या हॉटेलमधील वास्तव्यावर त्यांनी स्वतच्या खिशातून फक्त एकच कोटी रुपये खर्च केले असतील तर त्यावरून एवढा गहजब करण्याची काय गरज?
तीस वर्षे प्रगत देशांमध्ये राहून भारतात परतलेल्या शशी थरुर यांनी आल्याआल्या लोधी रोडवरील पाऊणशे वर्षे जुन्या, धड सोयी नसलेल्या ल्युटेन्सच्या भंगार बंगल्यात राहायला जावे अशी अपेक्षाच करणे चुकीचे ठरेल. पण काँग्रेसवाल्यांनी त्यांनाही ताज हॉटेलच्या बाहेर काढले.
देशावर दुष्काळाचे संकट ओढवल्याचे निमित्त करून काटकसरीने राहा, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे सांगण्याची तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला उपरती का व्हावी? पाच वर्षांपूर्वीही केंद्रात आमचेच सरकार होते आणि तेव्हाही सत्तेत आलो त्यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा असा उपदेश करायला प्रणवदा का धजावले नाहीत? त्यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या १४६ जागा होत्या आणि आता २०६ जागा झाल्या आहेत, हेच या काटकसरीच्या सल्ल्यामागचे मुख्य कारण आहे. त्यागाच्या भावनेतून काम करणाऱ्या मित्रपक्षांच्याच नव्हे तर आपल्याही नेत्यांविषयी काँग्रेसजनांना ईर्षां वाटते हेच खरे. १०, जनपथमध्ये जाऊन एखाद्याविषयी काडी घालायची आणि त्याचा परस्पर काटा काढून गंमत बघायची ही तर त्यांची जुनीच खोड आहे. दिवसातून तीनदा ड्रेस बदलतात म्हणून शिवराज पाटील यांना गृहमंत्रिपदावरून घालविण्यात हेच काडीबाज कारणीभूत ठरले.
आता कृष्णा आणि थरुर यांना ‘गृह’पाठ शिकविल्यानंतर त्यांच्या डोळ्यात इतर नेत्यांची साधी राहणी खुपायला लागली आहे. उत्तर प्रदेशात मोगल राज्यकत्यार्र्प्रमाणे भव्य दिव्य स्मारकांच्या रूपाने इतिहासात अजरामर होण्याची कल्पना आधीच्या कर्मदरिद्री राज्यकर्त्यांना सुचली नसेल तर त्यात मुख्यमंत्री मायावतींचा काय दोष? पण बुंदेलखंडमधील शेतकरी दुष्काळ आणि उपासमारीने तडफडत असताना मायावतींनी साडेतीन हजार कोटींची उधळपट्टी चालविली असल्याचा आरोप करून राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांनी आपली पोटदुखी जगजाहीर केली. फाइव्ह स्टार एअरलाइन्स कंपन्यांचे मालक ज्यांच्या दारात सदैव हात जोडून उभे असतात, अशा मंत्र्यांना बिझनेस क्लासच्या ऐसपैस खुच्र्या सोडून इकॉनॉमी क्लासने प्रवास करा, असा सल्ला देणे म्हणजे त्यांच्या मैत्रीचाच अपमान करणे नव्हे काय? शिवाय इकॉनॉमी क्लासच्या खुर्चीत ‘फिट’ बसू शकणाऱ्या मंत्र्यांनाच हा सल्ला देता आला असता. बिझनेस क्लासमध्येच फारुक अब्दुल्लांना पाय आखडते घ्यावे लागत असतील तर इकॉनॉमी क्लासमध्ये ते आपल्या स्वभावानुसार दोन-तीन तास थयथयाट न करता कशावरून बसतील? ममता बॅनर्जींसारख्या मंत्री कॉटनच्या स्वस्त साडय़ा, पायात स्लीपर आणि खांद्यावर कापडाची झोळी अडकवून रेल्वेच्या थर्ड क्लासमधून प्रवास करीत असतील तर अंबिका सोनींनीही डिझायनर्स साडय़ा, सँडल्स परिधान करणे तसेच बिझनेस क्लासमधून प्रवास करणे सोडून द्यावे अशी अपेक्षा बाळगणे रास्त ठरेल काय?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काटकसरीविषयी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असताना या मुद्यावरून वातावरण तापल्याचे वृत्त पसरवून निवडणुकीच्या तोंडावर आधीच अडचणीत आलेल्या मित्रपक्षांच्या काही मंत्र्यांची नाहक बदनामी करण्याचा काँग्रेसवाले प्रयत्न करीत आहेत. मुळात काटकसर, साधी राहणी या गोष्टीच निर्थक आहेत, यावर आम्हा सर्व पक्षांतील सहकाऱ्यांचे मतैक्य आहे. पण दात कोरून हा देश आर्थिक महाशक्ती बनू शकणार नाही, हे सोनिया गांधी, राहुल गांधींना पटवून देणार कोण?


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व