गंगेवर दोन
माणसें स्नानासाठी गेली, त्यातील एक जण म्हणतो “गंगा गंगा म्हणजे
काय? दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन असे दोन वायु एकत्र केले की झाली गंगा.” दुसरा म्हणतो “भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजुटात
राहिली, हजारो ब्रम्हर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली, अनंत
पुण्यकृत्ये हिच्या काठीं घडली; अशी ही पवित्र गंगामाई” या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो. देहशुद्धीचें फळ दोघांना मिळालेच, परंतु
त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळाले, गंगेत बैलालाही शुद्धी
मिळेल, अंगाची घाण जाईल परंतु मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धेचे तुच्छ फळ
मिळालें, दुसर्याला हे फळ मिळून शिवाय चित्तशुद्धीचे अमोल फळ मिळाले.
गीता-प्रवचने
विनोबा
परंधाम
प्रकाशन, पवनार