मी कसा झालो ?
आचार्य प्र.के. अत्रे
परचुरे प्रकाशन
किंमत : २५० रुपये.
पुणे शहर हे त्या वेळी सासवडहून आम्हाला दिल्लीइतके दूर वाटायचे. माझे एक चुलते होते. त्यांना पुण्याला चांगली नेकरी मिळाली. तेव्हा सर्व तयारी करून पुण्याला जावयाला ते निघाले. त्यांचा गोतावळा फार मोठा होता. पुण्याला ते चालले म्हणजे जणू काही साता समुद्रापलीकडे चालले, या भावनेने त्यांचे पाचपन्नास नातेवाईक घरापासून गावाबाहेरच्या दिवे नाक्यापर्यंत रडत-ओरडत त्यांच्या बैलगाडीमागून चालू लागले. शेवटी अखेरचा निरोप घेताना त्यांच्या आईने तर हृदयभेदक हंबरडा फोडला. त्यामूळे आमचे चुलते इतके हादरून गेले की ते गाडीवानाच्या गळ्याला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. गाडीवानही दुःखाने व्याकूळ होऊन आरोळ्या मारू लागला. गाडीचा बैल तर जागच्या जागी मटकन खाली बसला. अर्थात अशा परिस्थितीत पुढे प्रवास होणे अशक्यच होते. नोकरीसाठी पुण्याला जाण्याचा बेत आमच्या चुलत्यांनी त्या क्षणीच रद्द केला. आणि जन्मभर आपल्या आईपाशी सासवडलाच राहण्याची त्यांनी घेर प्रतिज्ञा केली. त्यांच्या बरोबरीने नोकरीला लागलेले महिना हजार-बाराशे रुपया पर्यंत चढून पाच-पाचशे रुपयांवर पुढे पेंशनीत निघाले. पण आमच्या चुलत्यांनी उभ्या आयुष्यात स्वतःच्या कष्टाने हजार रुपयेदेखील कमावले नासतील. आणि हे कशासाठी ? तर सासवड सोडून अठरा मैलांच्या अंतरावर असलेल्या पुणे नामक शहरी त्यांना जाणे अशक्य झाले म्हणून.