पंचगंगा ते गंगा
23 December, 2009 07:30:00 AMविजय मुडशिंगीकर
२००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.
मी मूळचा कोल्हापूरचा, करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी हे माझं जन्मगाव. पण माझं आजोळ वळीवडे हे पंचगंगेच्या काठावर वसलेलं. बालपण आजोळीच गेलेलं. त्यामुळे मनात खोलवर कुठे तरी ‘पंचगंगा’ आणि ‘गंगा’ वाहत आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षीच म्हणजे इयत्ता नववीत असताना घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मुंबईत क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीत कामाला लागलो. पुढे रात्रशाळेतून दहावीची परीक्षा दिली. तीनही पाळ्यांमध्ये काम करावं लागायचं. इच्छा असूनही शिक्षणाची आवड मात्र पूर्ण करता आली नाही. पण वाचनाची आवड मात्र जोपासता आली. या छंदातूनच मी दोनदा जिवावरच्या दुखण्यातून वाचलो. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण माझ्या बाबतीत शब्दश: खरी ठरली.
याच काळात छायाचित्रणाचीही आवड निर्माण झाली आणि त्याचं रूपांतर छंदात कधी झालं कळलंच नाही. घरगुती समारंभांपासून ते थेट निसर्गाच्या सान्निध्यात भटकून फोटोग्राफी करता आली. कुठलंही तांत्रिक शिक्षण नाही, कोणीही शिकवलं नाही, अशा परिस्थितीत मी एकलव्याच्या चिकाटीनं ही कला आत्मसात केली. आज गंगेचा प्रवाह उभा-आडवा फिरताना, तिथला परिसर कॅमे-यात बद्ध करताना मला या कलेचा आणि चिकाटीचा नक्कीच लाभ झाला. १९९८मध्ये पाठदुखीच्या व्याधीमुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट व्हावं लागलं होतं. तिथं निसर्ग लेखक सुरेशचंद्र वारघडे यांचं‘हिमयात्री’ पुस्तक वाचलं. त्यातला ‘भगिरथ तेरी गंगा मैली’ हा लघुलेख वाचला आणि मी अंतर्मुख झालो. त्यात गंगा नदीच्या प्रदूषणाची व्यथा मोठ्या आर्तपणे मांडली होती. ती वाचून आंतर्बाह्य हादरलो. गंगा नदी माझ्या मनात ठसली ती तेव्हाच. स्लीपडिस्कमुळं जवळपास अपंगावस्थेतच होतो मी. पण डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी केलेल्या उपचारामुळे मी चालू-फिरू लागलो. त्यांच्यामुळेच आज मी माझ्या पायांवर उभा आहे. २००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून वेगवेगळ्या ऋतूंमधील गंगानदीच्या निसर्गसौंदर्यापासून ते तिच्या काठच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा आणि वाढत्या प्रदूषणामुळे घाण झालेल्या नदीचा वेध घेतला. हा प्रवास म्हणजे अनुभवांची खाण होती. या अनुभवांचा परिपाक म्हणजेच माझं ‘गंगाजल’ हे छायाचित्रांचं प्रदर्शन. या दरम्यान आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत माझे विचार मांडलेत. ‘पंचगंगा’ नदीच्या काठचा मी, आज ‘गंगा’ नदीच्या ओढीनं कसा प्रवाहत गेलो, तेही सांगितलंय. भूमिका स्पष्ट करताना अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे त्यात. कारण गंगाजल प्रदर्शन, निसर्ग, पर्यावरण, प्रबोधन, सामाजिक बांधिलकी, छायाचित्रकला, सर्वसामान्यांपर्यंत गंगा नदीचं आणि पाण्याचं महत्त्व, त्यासाठी राबवलेले उपक्रम.. अशा सा-या संकल्पनांचं शब्दरूपी संकलन होणं मला गरजेचं वाटत होतं. खरं तर मी मितभाषी. माझा ‘बोलण्यापेक्षा करण्यावर’ अधिक विश्वास आहे. लेखन हा माझा प्रांत नाही. पण नरेंद्र प्रभू यांच्यासारखे सुहृद मला लाभले आणि जे केलं ते सुसंवादातून व्यक्त करता आलं. माझ्या कामातून जर कोणाला निसर्ग संवर्धनाचं वेड लागलं तर आनंदच होईल. माझा चांगुलपणावर आणि माणसातील माणुसकीवर अतोनात विश्वास आहे. फक्त त्यांच्यात मानवतावादी दृष्टिकोन झिरपता ठेवता आला पाहिजे, एवढंच. गंगाकाठचा माझा प्रवास कधी संपणारा नाही. अखंड भारतवर्षाला एकतेच्या एका समान धाग्यात बांधणारी गंगा आपल्याला आर्त साद घालते आहे. तिला प्रत्येकानं मनापासून प्रतिसाद द्यावा, इतकीच अपेक्षा!