शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

Showing posts with label सावरकर वाड़्मय. Show all posts
Showing posts with label सावरकर वाड़्मय. Show all posts

जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||


राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,

स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,

परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,

स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||||


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,

स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,

तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,

स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची ।।२।।


मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,

तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||||


जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला

मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


सागरा, प्राण तळमळला ...

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन

विश्र्वसलो या तव वचनी मी

जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी

येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला

सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी

भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे

नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाब ही आता रे

फुलबाग मला, हाय, पारखा झाला

सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे

बहुजिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे

तद्विरहाची शपथ घालितो तुजला

सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती

तरि आंग्लभूमिभयभीता रे

अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे

जो आचमनी एक क्षणी तुज प्याला

सागरा, प्राण तळमळला ...


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

आरती शिवाजी महाराजांची

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........


-
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

शिव वंदना

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व