शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

आम्ही आम आदमीचे ‘शिपाई’! - सुनील चावके


आम्ही आहोत या देशातील कोटय़वधी आमआदमीचे शिपाई. देशाला स्वातंत्र्य लाभून ६२ वर्षे लोटले तरी बेरोजगारी, उपासमारी, पिण्याचे शुद्ध पाणी, निवारा, शिक्षण व आरोग्य सुविधांच्या अभावी जनता वंचित व उपेक्षित आहे. जनतेच्या उत्थानाचा नुसता विचार करण्यासाठीच आम्हाला किती मानसिक, बौद्धिक, शारीरिक कष्ट उपसावे लागतात याचा नेमका व खरा अंदाज कुणालाच येऊ शकणार नाही.

दिल्लीत दीड-दोन एकरांच्या प्रशस्त बंगल्यात राहिल्याशिवाय आम्ही शंभर-दीडशे चौरस फुटांमधील निवाऱ्यासाठी धडपडणाऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही. अंधारात चाचपडणाऱ्यांच्या समस्यांची चर्चा करताना आम्हाला अखंड वीजपुरवठा आणि भरदिवसा दिव्यांचा लखलखाट लागतो. दालनात एअर कंडिशनरचा गारठा नसेल तर उन्हातान्हात राबणाऱ्यांच्या भल्याचे धोरण आखताना आमचे डोकेच काम करीत नाही. उपासमारीने गांजलेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन कण कसे पडतील, हे आम्हाला पंचतारांकित हॉटेलातील काँटिनेंटल पंचपक्वानांचा आस्वाद घेतल्याशिवाय सुचतच नाहीत. गढूळ आणि दूषित पाणी पिऊन तहान भागविणाऱ्यांची चिंता करताना आमच्या घशाला पडलेली कोरड मिनरल वॉटर किंवा कोल्ड ड्रिंक्सनेच शमते. मैलोन्मैल पायपीट करणाऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी रस्त्यांवर फिरताना आम्हाला सर्वसुविधांनी सज्ज एअर कंडिशन्ड एसयुव्हीच लागते. जनतेच्या भल्याची चिंता करण्यातच एवढा वेळ जातो की पायी चालण्याचा आनंद आमच्या वाटय़ाला येतच नाही. गरीब, उपेक्षित व वंचितांची दिवसरात्र चिंता करून हृदयविकार, हायपरटेंशन, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा बळावल्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे नाइलाजाने आम्हाला वातानुकूलित गाडी सोबत ठेवून मॉर्निंग किंवा इव्हनिंग वॉक करणे भाग पडते. सायकल, सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, बसगाडय़ा, रेल्वेगाडय़ांनी प्रवास करून सर्वसामान्यांना होणाऱ्या दैनंदिन दगदगीचे स्वरूप समजून घेणे आम्हाला शक्यच नाही. एवढेच काय, विमानात पाठीमागे बसलेल्या आम आदमीला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, याची कल्पना आम्ही केवळ बिझनेस क्लासमध्ये बसूनच करू शकतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची गुंतागुंत वाढून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले की त्यावर श्ॉम्पेन, व्होडका, वाईन आणि अन्य विरंगुळ्याच्या डिप्लोमसीशिवाय तोडगाच निघू शकत नाही. काय करणार? आमच्या सेवेचे स्वरूपच असे आहे की सतत कार्यमग्न राहण्यासाठी आवश्यक असलेली ही जीवनशैली स्वीकारली नाही तर उच्च विचारांची प्रेरणा लाभून जनतेची जी सेवा आमच्या हातून घडायला हवी ती घडणारच नाही. एवढय़ा तरी सुविधा आहेत म्हणूनच आम्हाला रोज १६ ते १८ तास काम करणे शक्य होते. या तुटपुंज्या सुविधांविषयी कधीही ब्र न काढता आम्ही दशकानुदशके आणि पिढ्यान्पिढय़ा पूर्ण क्षमतेने काम करू शकलो तेव्हा कुठे भारताला आर्थिक महाशक्ती म्हणून अमेरिका, चीनसह युरोपातील बलाढय़ देशांना आव्हान देणे शक्य झाले. आम्हाला दिल्लीत कोणकोणत्या विवंचनांना सामोरे जावे लागते याची आम आदमीला जाणीव नसेल तर ते एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ज्यांच्या साक्षीने आम्ही हे त्यागाचे अग्निहोत्र प्रज्वलित केले त्यांनाच आमच्या या जीवनशैलीचा तिटकारा यावा हे म्हणजे अतीच झाले. आमचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नंबर टूप्रणवदा यांच्याप्रमाणे गरिबी काय असते हे आम्हालाही ठाऊक आहे. पण गरिबी ही ऑलिम्पिक मेडलसारखी मिरवायची गोष्ट नसते, हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. गरिबीवर मात करताना प्रारंभी केलेल्या जनसंग्रहाचे बघता बघता धनसंग्रहात रूपांतर करून सातासमुद्रापलीकडच्या स्विस बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी लागणारे कसब व धाडस त्यांच्यात नसावेच. म्हणूनच साध्या राहणीचा फाजील सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. दारिद्रय़ निर्मूलनाचा आम्हालाच फस्र्ट हँड अनुभव नसेल तर ११० कोटी लोकसंख्येच्या भारताचे श्रीमंत आणि समृद्ध देशांच्या पंक्तीत बसण्याचे स्वप्न कधीच साध्य होणार नाही. गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून अख्खे आयुष्य ओढगस्तीत आणि काटकसरीतच काढायचे, असे कोणत्याही तत्त्ववेत्याने सांगितलेले नाही. सरसंघचालकांनी कितीही कानपिचक्या दिल्या तरी भाजपचा एकही नेता असला काटकसरीचा सल्ला मान्य करणार नाही. वैंकय्या नायडूंनी भाजपच्या वतीने तशा भावनाही व्यक्त केल्या आहेत. गरिबीला ग्लॅमर मिळवून देणारे आमचे कम्युनिस्ट सहकारीही असल्या युक्तिवादाशी हातचे राखूनच सहमत होतील. मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडून छोटय़ाशा घरात राहणाऱ्या बुद्धदेव भट्टाचार्यानाही ते फार भाव देत नाहीत. त्यांनादेखील धूर काढत गरिबांचा विचार करायला ट्रिपल फाइव्ह किंवा बेन्सन अँड हेजेसच लागते. परदेशात गेल्यावर पंचवीस हजारापेक्षा कमी किंमतीचा शर्ट खरेदी करणे कॉम्रेडांनाही कमीपणाचे वाटते. हा सारा अंगीभूत साधेपणा त्यांनी आपल्या संसदीय आणि वैचारिक मेहनतीचे मोल पक्षाच्या खजिन्यात जमा करून टिकवून ठेवला आहे. धूर काढायला आणि शॉपिंग करायला पैसा कुठून आला, असे कुणी त्यांना विचारत नाही.
सर्वसामान्यांविषयी वाटणारी तळमळ आणि आत्मीयतेपोटी आमचे अनेक सहकारी मंत्री सरकारची एक दमडीही न स्वीकारता निरपेक्षभावनेने देशापुढचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. मतदारांना खूष करण्यासाठी पदरचे कोटय़वधी रुपये उधळून लोकसभेवर निवडून यायची आम्हाला हौसच आहे. सार्वजनिक जीवनात पैशाचा खूपच अतिरेक केला तर राजू शेट्टींसारखे कफल्लक किंवा रामविलास पासवान यांना पराभूत करणारे रामसुंदर दास यांच्यासारखे नव्वदीला टेकलेले वृद्ध निवडून येतात. पण असल्या अपवादांमुळे आमच्या उत्साहावर विरजण पडत नाही.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा स्वातंत्र्यपूर्व काळातील मंत्र होता. आता ग्लोबल वार्मिंगमुळे उच्च विचारसरणीसाठी उच्च दर्जाची राहणी अनिवार्य बनली आहे, हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींसारख्या हौशी राजकीय नेत्यांना कसे कळणार? , रेसकोर्सशेजारी सरकारी बंगला मिळूनही परराष्ट्र मंत्री कृष्णांना त्यात कधी राहावेसे वाटले नाही तर त्यांचा काय दोष? साध्या राहणीवर कमालीचा विश्वास असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्तींचे ते मित्र आहेत. त्यामुळे साधेपणाने कसे जगायचे हे खरे तर त्यांना प्रणवदांनी सांगायची आवश्यकताच नाही. इन्फोसिससारखी ग्लोबल कंपनी स्थापन करूनही नारायणमूर्ती आपल्या कार्यालयात सायकलने जायचे किंवा स्वत स्वच्छतागृहाची निगा राखायचे. पण याचा अर्थ कृष्णांनीही त्यांचे अनुकरण करावे, असा होत नाही. पंतप्रधानांच्या शेजारच्या बंगल्यात राहण्यात कृष्णांना जसे स्वारस्य वाटले नाही तसेच नारायणमूर्तींच्या साधेपणावरही ते भाळले नाहीत. कृष्णा सर्व ऐहिक गोष्टींच्या पलीकडे गेले असल्याचीच त्यातून साक्ष पटते. अशा व्यक्तीला प्रणवदांनी पिच्छा पुरवून मौर्य शेरेटनच्या स्युईटमधून बाहेर पडण्यास भाग पाडावे, हे काही बरोबर नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असताना ते कसे जगत होते, याकडे काँग्रेसच्या नेत्यांचे यापूर्वी का लक्ष गेले नाही? यंदा कर्नाटकातून लोकसभेवर निवडून आलेल्या बहुतांश खासदारांना आपल्या निवडणुकीवर पाच ते दहा कोटी रुपये खर्च करावे लागले. कृष्णा मात्र एक पैसा खर्च न करता राज्यसभेवर निवडून आले आहेत. दिल्लीत शंभर दिवसांच्या हॉटेलमधील वास्तव्यावर त्यांनी स्वतच्या खिशातून फक्त एकच कोटी रुपये खर्च केले असतील तर त्यावरून एवढा गहजब करण्याची काय गरज?
तीस वर्षे प्रगत देशांमध्ये राहून भारतात परतलेल्या शशी थरुर यांनी आल्याआल्या लोधी रोडवरील पाऊणशे वर्षे जुन्या, धड सोयी नसलेल्या ल्युटेन्सच्या भंगार बंगल्यात राहायला जावे अशी अपेक्षाच करणे चुकीचे ठरेल. पण काँग्रेसवाल्यांनी त्यांनाही ताज हॉटेलच्या बाहेर काढले.
देशावर दुष्काळाचे संकट ओढवल्याचे निमित्त करून काटकसरीने राहा, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे सांगण्याची तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला उपरती का व्हावी? पाच वर्षांपूर्वीही केंद्रात आमचेच सरकार होते आणि तेव्हाही सत्तेत आलो त्यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा असा उपदेश करायला प्रणवदा का धजावले नाहीत? त्यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या १४६ जागा होत्या आणि आता २०६ जागा झाल्या आहेत, हेच या काटकसरीच्या सल्ल्यामागचे मुख्य कारण आहे. त्यागाच्या भावनेतून काम करणाऱ्या मित्रपक्षांच्याच नव्हे तर आपल्याही नेत्यांविषयी काँग्रेसजनांना ईर्षां वाटते हेच खरे. १०, जनपथमध्ये जाऊन एखाद्याविषयी काडी घालायची आणि त्याचा परस्पर काटा काढून गंमत बघायची ही तर त्यांची जुनीच खोड आहे. दिवसातून तीनदा ड्रेस बदलतात म्हणून शिवराज पाटील यांना गृहमंत्रिपदावरून घालविण्यात हेच काडीबाज कारणीभूत ठरले.
आता कृष्णा आणि थरुर यांना गृहपाठ शिकविल्यानंतर त्यांच्या डोळ्यात इतर नेत्यांची साधी राहणी खुपायला लागली आहे. उत्तर प्रदेशात मोगल राज्यकत्यार्र्प्रमाणे भव्य दिव्य स्मारकांच्या रूपाने इतिहासात अजरामर होण्याची कल्पना आधीच्या कर्मदरिद्री राज्यकर्त्यांना सुचली नसेल तर त्यात मुख्यमंत्री मायावतींचा काय दोष? पण बुंदेलखंडमधील शेतकरी दुष्काळ आणि उपासमारीने तडफडत असताना मायावतींनी साडेतीन हजार कोटींची उधळपट्टी चालविली असल्याचा आरोप करून राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांनी आपली पोटदुखी जगजाहीर केली. फाइव्ह स्टार एअरलाइन्स कंपन्यांचे मालक ज्यांच्या दारात सदैव हात जोडून उभे असतात, अशा मंत्र्यांना बिझनेस क्लासच्या ऐसपैस खुच्र्या सोडून इकॉनॉमी क्लासने प्रवास करा, असा सल्ला देणे म्हणजे त्यांच्या मैत्रीचाच अपमान करणे नव्हे काय? शिवाय इकॉनॉमी क्लासच्या खुर्चीत फिटबसू शकणाऱ्या मंत्र्यांनाच हा सल्ला देता आला असता. बिझनेस क्लासमध्येच फारुक अब्दुल्लांना पाय आखडते घ्यावे लागत असतील तर इकॉनॉमी क्लासमध्ये ते आपल्या स्वभावानुसार दोन-तीन तास थयथयाट न करता कशावरून बसतील? ममता बॅनर्जींसारख्या मंत्री कॉटनच्या स्वस्त साडय़ा, पायात स्लीपर आणि खांद्यावर कापडाची झोळी अडकवून रेल्वेच्या थर्ड क्लासमधून प्रवास करीत असतील तर अंबिका सोनींनीही डिझायनर्स साडय़ा, सँडल्स परिधान करणे तसेच बिझनेस क्लासमधून प्रवास करणे सोडून द्यावे अशी अपेक्षा बाळगणे रास्त ठरेल काय?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काटकसरीविषयी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असताना या मुद्यावरून वातावरण तापल्याचे वृत्त पसरवून निवडणुकीच्या तोंडावर आधीच अडचणीत आलेल्या मित्रपक्षांच्या काही मंत्र्यांची नाहक बदनामी करण्याचा काँग्रेसवाले प्रयत्न करीत आहेत. मुळात काटकसर, साधी राहणी या गोष्टीच निर्थक आहेत, यावर आम्हा सर्व पक्षांतील सहकाऱ्यांचे मतैक्य आहे. पण दात कोरून हा देश आर्थिक महाशक्ती बनू शकणार नाही, हे सोनिया गांधी, राहुल गांधींना पटवून देणार कोण?


0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व