शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी
महाराष्ट्राच्या हातापायात गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा जेव्हा जेव्हा कोणी डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. आणि त्या बंडखोरांच्या हाकेला सार्‍या महाराष्ट्राकडून साद मिळते. धर्ममार्तंडांनी आणि पंडीतांनी धर्माची तत्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यात आणि संकृतच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून जनतेला वर्षानूवर्षे आज्ञानांत आणि दास्यात ठेवले. त्या विरूद्धा ज्ञानेश्वरांनी गोदावरीच्याकाठी बंडाचा झेंडा  प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघरी पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्रा भुमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा त्या सत्ते विरूद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठतेचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणार्‍या नि साधुत्वाचा आव आणणार्‍या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारी मार्ग बंद करून टाकले तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडार्‍याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला.

महाराष्ट्र ही बंडखोरांची भुमी आहे. या भुमीमध्ये गेल्या सातशे आठशे वर्षात अनेक मोठीमोठी बंडे झालेली आहेत.
महाराष्ट्राच्या रक्तात बंड आहे, ते कधी थिजत नाही.
महाराष्ट्राच्या मासांत बंड आहे, ते कधी गोठत नाही.
महाराष्ट्राच्या हाडात बंड आहे, ते कधी मोडत नाही.
महाराष्ट्राच्या डोक्यात बंड आहे, ते कधी वाकत नाही.
महाराष्ट्राच्या डोळ्यात बंड आहे, ते कधी विझत नाही.
महाराष्ट्राच्या छातीत बंड आहे, ते कधी हटत नाही.
महाराष्ट्राच्या मनगटात बंड आहे, ते कधी पिचत नाही.


प्र.के. अत्रे

निवडक नवयुग
१९८०-१९६०
मॅजेस्टिक बुक हाऊस
मुल्य:  ७५०        

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व