शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

आपण सगळेच मालदिवी आहोत!


बदलते विश्व , बदलता भारत
ज्ञानेश्वर मुळे - रविवार, ७ फेब्रुवारी २०१०
dmulay@hotmail.com
साभार लोकसत्ताकोपनहागेनमध्ये डिसेंबरात उडालेली पर्यावरणाच्या बदलाची धूळ आता पुन्हा शांत झालेली आहे. ती धूळ जशी अभूतपूर्व होती तशीच त्यानंतरची ही शांतता अभूतपूर्व आहे. पर्यावरणाचं काहीही ज्ञान नसलेल्या पण तरीही प्रिय पृथ्वीच्या भविष्याची धास्ती घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाला या विषयावर चिंतन करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे. पर्यावरण बदलामुळे असे झाले तसे झाले असे आपण म्हणतो, ते मात्र साफ चुकीचे आहे. मानव बदलहे या सगळ्या समस्येचे मूळ आहे. पर्यावरणाच्या जाणिवेचा शंख फुंकत असताना मानवी जाणिवेपासून आपण किती दूर गेलो आहोत याचा मात्र आपणाला विसर पडला आहे. आपला दृष्टिकोन आणि जीवनशैली दोन्हींमधल्या प्रदूषणात स्वच्छ भविष्याचा विचार करण्याची शक्तीही काही अंशी बधीर झाल्यासारखे वाटते.
मी जिथे राहतो त्या मालदीवचं उदाहरण घेऊ. निसर्गाचा असा वरदहस्त क्वचितच एखाद्या देशावर असतो. अकराशे ब्याण्णव छोटी छोटी बेटं असणारा हा देश, जगाचं वाढतं तापमान व वितळणारे हिमखंड यांच्यामुळं समुद्राची उंची दीड मीटर वाढली तर अख्खा देशच पाण्याखाली जाईल. परवाच्या कोपनहागेन परिषदेच्या वेळी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला संदेश सोपा व सरळ होता. आज संकटाच्या दारात मालदीवियन उभे आहेत, पण खरं तर जगातला प्रत्येक माणूस मालदीवियन आहे, आपण सगळे मालदीवियन आहोतमी जेव्हा जेव्हा समुद्राकडं पाहतो, बेटांची मखमली वाळू मुठीत घेतो, मावळत्या सूर्याच्या पाश्र्वभूमीवर उभी असणारी जहाजं बघतो तेव्हा माझ्या कानात शब्द गुंजतात, ‘आपण सगळे मालदीवियन आहोत’.
प्रथमदर्शी मालदीवची ही बेटं हिंद महासागरात कुणी रत्नंमाणकं विखरलेली नाहीत ना असे वाटत राहते. पण मानवी संस्कृतीच्या प्रगतीनं या देशाच्या पावित्र्याचा भंग केव्हाच केला आहे. मालदीव देशात तीन स्वतंत्र जीवनशैली आढळतात. राजधानी मालेची जीवनशैली, आरामदायी रिसॉर्ट बेटांची जीवनशैली आणि पारंपरिक मालदिवी बेटांची जीवनशैली. पारंपरिक बेटांपैकी जवळजवळ पंधरावीस बेटांना मी भेटी दिल्या आहेत. त्यात राजधानीजवळची बेटं तशी राजधानीपासून शेकडो कि.मी. उत्तर तशीच दक्षिणेला असणारी बेटं मी पाहिलीत. अशी बेटं जवळजवळ दोनशे असून त्यावर फक्त मालदिवी लोकच राहतात. साधे लोक, साधे रस्ते, नारळांची झाडं, चोहोबाजूला सागर, शिक्षण व आरोग्याच्या मुलभूत सुविधा, घरं साधी पण ऐसपैस, प्रार्थनेला एक मशिद, लोकसंख्या फारतर सातआठशे आणि दीड दोन चौ. कि.मी. असं या बहुसंख्य बेटांचं स्वरूप आहे. जगापासून तुटलेलं असलं तरी जीवन शांत व सुंदर आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरी टी.व्ही., सफाई मशिन, धुलाई यंत्र वगैरे आधुनिक उपकरणं आहेत. नावापुरती शेती आहे. जीवनावश्यक वस्तू राजधानी मालेतून बोटीने आठवडय़ातून एकदा येतात. संध्याकाळच्या वेळी सगळं बेट फुटबॉलच्या मैदानावर किंवा बोटी ये-जा करतात त्या धक्क्यावर जमतं. लोक बाष्फळ गप्पा मारतात किंवा फक्त बसून राहतात. गेली अडीच हजार र्वष ही गावं स्वयंपूर्ण जीवन जगताहेत. त्यांच्या आजुबाजूच्या बेटांशी संपर्क होता, पण जगाशी संबंध सुरू झाला तो केवळ गेल्या तीस-चाळीस वर्षांत. कुणालाही हवंहवंसं वाटावं असं हे जीवन; पण बाह्य जगाचा स्पर्श झाला आणि विकास आणि प्रगतीच्या जखमांनी हळूहळू ही बेटं वेदनाग्रस्त होऊ लागली आहेत.
या बेटांची अवस्था कोकणातल्या गावांसारखी झाली आहे. सगळी कर्ती पिढी राजधानी मालेला जायला निघाली आहे. गावात फक्त स्त्रीया-माणसं आणि प्राथमिक फार तर माध्यमिक शाळेत जाणारी मुलं-मुली. संपूर्ण प्रदूषणमुक्त, स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली, माणसामाणसातल्या नात्यानं संपन्न व परिपूर्ण अशी ही बेटं आता मालेकडं डोळे लावून बसतात. इथल्या जनतेला मालेचीच स्वप्नं पडतात. आपल्या गावातील पवित्र आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या पर्यावरणाऐवजी त्यांना प्रति चौ. कि.मध्ये जगातील सर्वोच्च जन-घनता असलेल्या माले शहरात जाण्याची घाई झाली आहे. प्रगती आणि विकासाच्या आकांक्षांनी त्यांच्या मनाचे पर्यावरण कोसळले आहे.
आता माले या राजधानीच्या शहरातील जीवनशैली बघूया. फक्त तीन चौ. कि. मी.च्या क्षेत्रात जवळजवळ सव्वा ते दीड लाख लोक उभे राहतात. इथे सरकारी इमारती व कार्यालये, शाळा, दवाखाने, खासगी कंपन्यांची कार्यालये, दुकाने, बहुमजली इमारती या व इतर आधुनिक शहरात असणाऱ्या सगळ्या सोयी (व गैरसोयी) आहेत. उंदराच्या बिळांसारखी, माणसांची घरं आहेत, प्रत्येकजण सकाळी उठून कुठंतरी जाण्याच्या घाईत असतो, आपण काहीतरी फार महत्त्वाचे काम करत आहोत अशी त्याची धारणा असते, दुकानांचे दरवाजे उघडतात, बंद होतात, एकाऐवजी पंचवीस-तीस मशिदींमधून बांग ऐकू येते. गर्दीने, माणसांच्या प्रगतीने एकेकाळचे या छोटय़ा बेटाचे निसर्ग-संगीत हिरावून घेतले आहे. इथल्या लोकांना रुपैयाबरोबर डॉलरही कळतो, त्यांना अधिक उर्जेची भूक लागली आहे, घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. जेवण गरमगरम खायला वेळ नाही. त्यामुळे मायक्रोवेव्ह लागतो. या शहराचे दरडोई कार्बन उत्सर्जन भारतातील दरडोई उत्सर्जनापेक्षा कितीतरी अधिक आहे. या छोटय़ा बेटावर जवळजवळ तीस हजार मोटारसायकली आहेत.
या शहराला बेट म्हणावे असे इथे काहीच नाही. इथला एकमेव समुद्रकिनाराही कृत्रिमआहे. आठवडय़ाचे पाच दिवस काम करून इथलाही माणूस कंटाळतो, त्याचा जीव आंबून जातो. तेव्हा तो टाइमपास, शॉपिंग किंवा आराम करण्यासाठी कोलंबो, बेंगलोर किंवा सिंगापूरला जातो किंवा जायची स्वप्नं बघतो. कधी कधी मालदीवमधल्या आरामदायी रिसॉर्ट बेटांवर जायची इच्छा बाळगतो आणि संधी मिळताच तिथं पोहोचतोही.
आहे तरी काय या रिसॉर्ट बेटांवर? हीसुद्धा पारंपरिक मालदिवी बेटांसारखी छोटी छोटी बेटं आहेत. पण तिथं मालदिवी माणसं राहात नाहीत. मालदिवी बेटांमधली जवळजवळ हजारभर बेटं निर्मनुष्य आहेत. त्यातली शंभर बेटं भाडय़ानं दिली आहेत आंतरराष्ट्रीय हॉटेल कंपन्यांना. या कंपन्यांनी या बेटांवरती तुमच्या-आमच्या मनातल्या ऐशोआरामच्या सगळ्या कल्पनांना मूर्त रूप दिलं आहे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला माणूस सांगतो, ‘सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही जिथं आकाश आणि सागर भेटतात, जिथं असीम सौंदर्य शोधावं लागत नाही ते आसपास घुटमळत असतं, जिथं आपण आनंदमय होऊन जातो तिथं तुझ्यासोबत असावं असं वाटतं.असं अप्रतिम सुंदर विश्व या शंभर बेटांवर निर्माण करण्यात आलं आहे.
पण त्यात एक मेख आहे. तुमचा खिसा खोलअसावा लागतो. किती खोल? एका दिवसाचे (किंवा रात्रीचे) एका शयनगृहाचे भाडे तीस-चाळीस हजार रुपयांपासून पाच-दहा लाख रुपयांपर्यंत. तिथं सामान्य माणूस जाऊ शकत नाही. गंमत म्हणजे या रिसॉॅर्ट बेटांवर आणि मालदीवच्या पारंपरिक बेटांवर निसर्गाचे सगळे रंग, विभ्रम, आविष्कार सारखेच आहेत. फक्त पारंपारिक बेटांवर साधा सोज्ज्वळ बावनकशी आनंद आहे, त्याला ऐशोआरामाची झालर नाही. रिसॉॅर्टवरती जलक्रीडा, शेकडो प्रकारचे मालिश, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, स्नोर्केलिंग वगैरे आनंदाचे अनेक आधुनिक आविष्कार आहेत. पण कुणी कुणाला ओळखत नाही. याउलट पारंपरिक बेटांवर बोलणारी चालणारी एकमेकांशी नातं असणारी, प्रेम तसंच भांडणं करणारी जनता दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळ वस्ती करून आहे. या माणसांचे आणि निसर्गाचे एक गूढ नाते आहे. हे नातेही असेच जन्मोजन्मीचे आहे. ते शिडाच्या बोटी चालवतात, वल्हवतात, पोहतात, मासे पकडतात. निसर्ग त्यांचा अन्नदाता आहे. ते निसर्गावर प्रेम करतात. रिसॉर्ट बेटांवर माणसं पाहुणे बनून येतात, पैशाच्या आकाराप्रमाणे आराम विकत घेतात, व्हिडीओ, फोटो वगैरेंच्या माध्यमातून आठवणी गोळा करतात आणि पुनश्च महानगरातील आपापल्या गुहांमध्ये परततात. पुढच्या वर्षी पुन्हा एन्जॉय’, करायला यायचंच, असा निश्चय करून.
ही माणसं ज्या महानगरांमधून येतात. तिथंही त्यांचं कार्बन योगदान प्रचंड प्रमाणात असतंच. पण या बेटांवर असतांनाही त्यांचा कार्बन उपभोगवाढतो. कारण जितका ऐशोराम अधिक, तितका वीज व इंधन यांचा उपयोग आणि कार्बन उत्सर्जन अधिक. बेटसदृश जीवन जगतानाही उपभोग शैली मात्र महानगरीच. ही माणसं वातावरणाचं तापमान वाढायला, जीवाश्म इंधनाचा उपभोग घेण्यात, हिमालयातील हिमखंड प्रचंड वेगाने वितळवण्यात, जगभरच्या हवामानाचा समतोल बिघडवण्यात सिंहाचा वाटा उचलतात आणि त्यानंतर क्योतोपासून कोपनहागेनपर्यंत हिरवे तंत्रज्ञान’, ‘अपारंपारिक उर्जास्रोतआदी विषयांवर भाषणे देण्यासाठीलाखो रुपये आकारतात.
आपल्याकडेही वेगळ्या अर्थाने गेल्या साठ वर्षांत विकासाच्या नावाखाली लाखो लोकांनी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला. गावातील निसर्गासमवेतच्या निम्न कार्बन उत्सर्जन श्रेणीतून ही लाखो कुटुंबं प्रगती करत उच्च कार्बन उत्सर्जन श्रेणीत आली. मी ही त्यातलाच एक प्रतिनिधी आहे. आमचा सर्वाचा तथाकथित विकास आपणा सर्वाना आश्रय देणाऱ्या पृथ्वीच्या अस्तित्वावर घाला घालत आहे. महात्मा गांधींच्या खेडय़ाकडे चला’, ‘साधे राहाया संदेशातील तथ्य आता शास्त्रज्ञ समजावून सांगताहेत. वीज असो वा इंधन आता अपारंपारिक आणि अक्षय उर्जेशिवाय आपले काम चालणार नाही. यात पाश्चिमात्य जगताने बरोबर पाचर मारून ठेवली आहे. पृथ्वीच्या आणि माणसाच्या शोषणावर आधारित उच्च कार्बन उत्सर्जन जीवनशैली आणि त्याचे समर्थन करणारी अर्निबध भांडवलशाही यांच्या बळावर दोनशे वर्षे जगाला पिळून काढल्यानंतर आणि जागतिक विचारसरणी अधिक उपभोग-अधिक प्रगतीअशा समीकरणावर आणून ठेवल्यानंतर त्यांनी धोक्याची घंटी वाजवायला सुरुवात केली आहे. आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी ते आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान विकून आम्हाला रस्त्यावर काढायला तयार झाले आहेत.
गेल्या दोनशे वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेतून अस्वस्थ करणारे काही निष्कर्ष निघतात. त्यातले काही असे :
१) माणूस गावाकडून शहराकडे, शहराकडून महानगराकडे जातो तेव्हा आपली शैली निम्न कार्बन उत्सर्जनाकडून उच्च कार्बन उत्सर्जनाकडे नेत असतो.
२) ग्रामीण व अशिक्षितांच्या तुलनेने शहरी व सुशिक्षित लोक अधिक कार्बन उत्सर्जन करतात आणि म्हणून पर्यावरणाला अपाय करतात.
३) गरीबांच्या तुलनेने श्रीमंत अधिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यायाने पृथ्वीचे अधिक नुकसान करतात.
विचार करणारे लोक व शास्त्रज्ञ दोघेही कमी उपभोग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा यांचं महत्त्व सांगताहेत. पण गरीब देशांसाठी याचा अर्थ मुंडासे व लंगोट घालणाऱ्याने शरीरभर कपडे घालू नयेत, सायकलवर बसणाऱ्याने गाडीचे स्वप्न बघू नये असा होतो. शिवाय रिसॉर्टवरच्या जनतेने पारंपरिक बेटांवर आणि महानगरातील लोकांनी गावी जावे असाही होतो. पण गाववाला असल्यामुळे त्यातली एक गोची मला कळते. गावांचा आत्मा नष्ट झाला आहे.
नद्या सुकल्या आहेत. साइनबोर्ड आणि टीव्ही टॉवरनी गावांना उघडे-नागडे करून टाकले आहे आणि उरल्यासुरल्या सौंदर्यावर राजकारण आणि पैशाची हाव या दोन्हींनी बलात्कार केला आहे. मागच्या वर्षी आमच्या गावात आम्ही काही लोकांनी ग्रामपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या कार्यक्रमात एका मोठय़ा पडद्यावर आम्ही गूगलवरती दिसणारी आमच्या गावाची प्रतिमा गावकऱ्यांना दाखवली. आकाशातून घेतलेले ते विहंगमतंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतिक होते. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट त्या चित्रात दिसली ती अशी, संपूर्ण गावात नजरेत भरेल असे एकही झाड नव्हते! चला गावाकडे!

साभार लोकसत्ता

1 comments:

Ap____M 10 February 2010 at 17:59  

Check out aerial photographs of earth on following links:

http://www.yannarthusbertrand2.org/index.php?option=com_datsogallery&Itemid=27&func=detail&catid=3&id=984&lang=en&l=1280

http://www.yannarthusbertrand.org/v2/yab_us.htm

Also see my article from Loksatta about exhibition of these snaps held on Marine Drive in December:

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=36521:2010-01-01-09-59-05&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व