भारतीयांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या गंगा नदीला नुकताच ‘राष्ट्रीय नदी’चा दर्जा देण्यात आला. खुद्द पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ही घोषणा केली. जनांच्या या श्रद्धेकडे सरकारचेही लक्ष आहे, असे या कृतीतून स्पष्ट झाले. आता पवित्र नदीकडे गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर थेट पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीचे लक्ष असेल. त्यामुळे गंगेचे भाग्यच उजळले, असा काहींचा समज होईल. याबाबत आशावादी असायलाच हवे, पण त्याच्याच बरोबरीने वस्तुस्थितीसुद्धा ध्यानात घ्यायला हवी. दुर्दैवाने वस्तुस्थिती फारशी आशावादी नाही. कारण गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि तिच्या पात्रातील जैवविविधता पुनरुज्जीवित करण्यासाठी याआधीसुद्धा ‘गंगा अॅक्शन प्लॅन’च्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ साली ही योजना हाती घेण्यात आली. त्याद्वारे प्रमुख शहरांमधून गंगेत मिसळणारे प्रदूषण कमी करण्याचे पाऊल उचलण्यात येणार होते. त्यासाठी काही प्रयत्न झाले, त्यावर आतापर्यंत ९०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्चही झाली. पण त्यातून हाशील काय झाले? तर ही योजना हाती घेतली, त्यावेळच्या तुलनेत गंगा अधिकच बिघडली. या योजनेच्या अपयशाबद्दल अनेक कारणे दिली जातात. गंगेच्या काठावर जे शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचा फारसा विचारच करण्यात आला नव्हता. नोकरशाहीची अनास्था आणि विशिष्ट काळानंतर या योजनेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या योजनेची परिणामकारकता राहिलीच नाही. पण या घटकांपेक्षाही सर्वात प्रमुख कारण होते, ते म्हणजे- ज्यांच्यासाठी हे सर्व केले गेले, त्या स्थानिक जनांचा सहभागच यात नव्हता. या पाश्र्वभूमीवर आता ‘राष्ट्रीय नदी’ जाहीर केल्यानंतर गंगेचे काय होणार, या प्रश्नाला निश्चित उत्तरही आहे. ते म्हणजे- त्यात जनांचा सहभाग राहिला तर काम फत्ते, नाहीतर पुन्हा ‘गंगा अॅक्शन प्लॅन’सारखे अपयश! गंगा नदीच्या बिघडलेल्या स्थितीबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि त्यातून गंगेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने मुंबईतील गंगाजल नेचर फाउंडेशनतर्फे येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये ‘जन जोडो गंगा यात्रा’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे गंगेच्या उगमापासून मुखापर्यंत प्रत्यक्ष पात्रातून प्रवास करण्यात येणार असून, काठावर प्रमुख शहरांमध्ये छायाचित्रांची प्रदर्शने भरविली जाणार आहेत. तसेच माहितीपट, व्याख्याने-पथनाटय़ांद्वारे गंगेच्या स्थितीबाबत जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्याला सढळ हाताने मदत करून आपणही गंगेची स्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलू शकता.. संपर्कासाठी : अभिजित घोरपडे-‘जनां’चे गंगा अभियान!- अभिजित घोरपडे
गंगेबद्दलच्या या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण इथे महाराष्ट्रात बसून काय करू शकतो? अनेकांना वाटेल, फारसे काही नाही. कारण त्यासाठी अपेक्षित असलेला लोकसहभाग आपण इतक्या दुरून कसा देऊ शकणार, हा प्रश्न आता प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे गंगेची स्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील एका संस्थेने या विषयावरील जनजागृतीचा वसा हाती घेतला आहे. मुंबईतील ‘गंगाजल नेचर फाउंडेशन’ ही ती संस्था! या संस्थेने येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या आसपास ‘जन जोडो गंगा यात्रा’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यामागचा उद्देश आहे तो गंगेच्या प्रदूषणाचा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याद्वारे गंगेच्या स्थितीबद्दल त्यांना संवेदनशील बनविण्याचा. त्यासाठीच या संस्थेतर्फे गंगेच्या उगमापासून (गंगोत्री) ते थेट तिच्या मुखापर्यंत (बंगालचा उपसागर) तब्बल २५२५ किलोमीटरची यात्रा हाती घेण्यात येणार आहे. गंगेच्या काठाकाठाने साधारणत: महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत सर्व प्रमुख टप्प्यांमध्ये गंगेची स्थिती दर्शविणाऱ्या वास्तव व प्रभावी छायाचित्रांची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. गंगेच्या काठावरील २५ धार्मिक स्थळांबरोबरच इतर ठिकाणीसुद्धा हे प्रदर्शन भरवून तिथल्या लोकांना गंगेकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लावणार आहे. याशिवाय या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने, पथनाटय़े, माहितीपट यांच्या माध्यमातूनही गंगेबाबत जागरुकता वाढविण्याचे काम केले जाणार आहे. या अभियानातील एक गट हरिद्वारपासून गंगेच्या मुखापर्यंत (बंगालचा उपसागर) प्रत्यक्ष पात्रातून प्रवास करेल. मार्गात ठिकठिकाणी गंगाजलाचे परीक्षण व इतर माध्यमातून गंगेच्या स्थितीबद्दल नेमक्या नोंदी मिळविण्यात येणार आहेत. तिच्या बिघडलेल्या स्थितीचे काठावरील लोकांवर काय परिणाम झाले आहेत, याचा अभ्यासही याद्वारे केला जाईल. शिवाय या सर्व उपक्रमाचे व्यवस्थित चित्रणही केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे गंगेच्या काठावरील तब्बल एक कोटी लोकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे सर्व केवळ हौसेपोटी केले जाणार नाही, तर त्याद्वारे हाती येणारी माहिती, स्थितीबाबतच्या नोंदी व निरीक्षणे पंतप्रधान कार्यालयाकडे सोपविण्यात येणार आहेत.
ही महत्त्वाकांक्षी मोहीम ज्या गंगाजल नेचर फाउंडेशनतर्फे हाती घेण्यात आली आहे, ती संस्था गंगा तसेच, नद्या व पाण्यांच्या विषयावर गेली कित्येक वर्षे सातत्याने काम करत आहे. या विषयावरील प्रदर्शने, याच विषयावरील छायाचित्र-माहितीपटसंदर्भात राष्ट्रीय स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. संस्थापक विजय मुडशिंगीकर म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व! त्यांना या विषयाची कोणतीही पाश्र्वभूमी नाही, या विषयातील पदव्या नाहीत किंवा आर्थिक पाठबळही नाही. तरीसुद्धा एका सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर कुठपर्यंत पोहोचता येते, याचे हे उत्तम उदाहरण! त्यांनी कॅमेरा घेऊन २००१ ते २००६ या काळात संपूर्ण गंगेची यात्रा केली आणि वेगवेगळ्या ऋतूतील गंगेचे छायाचित्रण केले. त्यातून दिसलेले गंगेचे विद्रूप स्वरूप त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातून या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून गंगेच्या खोऱ्यासह इतर भागातही जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आता ही ‘जन जोडो गंगा यात्रा’ योजण्यात आली आहे.
एक मराठी माणूस व महाराष्ट्रातील संस्था गंगेच्या स्थितीबद्दल इतकी आस्था ठेवून आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीसुद्धा करत आहे, ही बाबच आजच्या काळात दुर्मिळच! पण आव्हान पेलण्यासाठी त्यांना अनेकांची मदत लागणार आहे. गंगेच्या खोऱ्यात पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्था, विविध आश्रम, महाराष्ट्र मंडळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता वेळ आहे आपल्या सर्वाची. आपले श्रद्धास्थान असलेल्या गंगेचे खोरे खऱ्या अर्थाने पावित्र्य राखण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची ही संधीच आहे. त्याद्वारे इतक्या दूर अंतरावरूनही आपण गंगेवरची आपली श्रद्धा खऱ्या अर्थाने व्यक्त करू शकतो. त्यासाठी सढळ हाताने मदत करा आणि म्हणा.. हर हर गंगे!
वेबसाईट- www.gangajal.org.in
ई-मेल- admn@gangajal.org.in
विजय मुडशिंगीकर : ०९८६९०८६४१९, ०२२-२५७७५०७०
(संस्थेकडे ‘८० जी’ प्रमाणपत्र असल्याने देणगीच्या रकमेवर प्राप्तीकरातून सूट मिळेल.)
सोनेरी क्षण
-
असा विसावा मनास लाभेतनास करीतो शांत निवांतपुन्हा एकदा पुढती नेतो करण्या
कामे अविश्रांत पायामध्ये मासोळीची लाडीक हुळहुळ पुन्हा एकदाकानांमध्ये नाजुक
गुंजन ...
5 weeks ago
0 comments:
Post a Comment