शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

सर्व सुखात असोत



डॉ. राजीव सारंगपाणी
Published: Sunday, December 29, 2013
प्राणिजगत आणि मनुष्यजगत यांत काहीही फरक नाही. कारण आपण मूलत:प्राणीच आहोत. आपले सावज पकडण्यासाठी सर्व प्राणी सापळे रचतात. मग ते कोळ्याचे जाळे असो, नाहीतर सर्व सिंहिणींनी मिळून रचलेला व्यूह असो. असे केल्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. यात मजा अशी, की ज्यांना फसवायचे असते तेदेखील विविध प्रकारे आपल्याला खाऊ इच्छिणाऱ्या प्राण्यांना फसवत असतातच. म्हणजे काही फुलपाखरांना पंखांवर मोठे डोळे उत्पन्न होतात. पक्ष्यांना त्याची भीती वाटून ते त्यांना खात नाहीत. काही किडे आसपासच्या झाडांशी असे एकरूप होतात, की पक्ष्यांना कळतच नाही- इथे किडा आहे म्हणून! ही फसवाफसवी जी जमात योग्य  प्रकारे करते, ती तरते. उत्क्रांतिवाद हेच शास्त्रीयरीत्या सांगतो. पण याच प्राण्यांत काही प्राणी एकमेकांना इतके चतुर साहचर्य करतात, की आश्चर्य वाटावे. मगरी आ करून बसतात तेव्हा काही पक्षी त्यांचे दात साफ करतात. शार्क मासे वर्षांतून काही वेळा समुद्रात विशिष्ट ठिकाणी जातात. तिथे त्यांच्या अंगावरचे किडे खाणारे मासे असतात. ते त्यांची कातडी स्वच्छ करून देतात. अशी अनेक  साहचर्ये प्राण्यांत दिसून येतात.
मनुष्य हा स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेतो. सर्वाचे सामाजिक मन सारखेच उत्क्रांत होत नसल्याने सर्व माणसे सारखीच सुसंस्कृत असतात किंवा असावीत, असे वाटणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. आपण सर्वानी एकमेकांना न फसवता व्यवहार करावेत, असे आपण सर्व एकमेकांना सांगत असतो. आणि हे सांगणे हेच एक प्रकारचे फसवणे आहे, हे विसरून जातो. कित्येकजणांना फसवल्याशिवाय चांगला व्यवसाय वा चांगले काम करता येते, हेच माहिती नसते. त्यांच्या आयुष्याचे सरळसरळ दोन भाग असतात. एक म्हणजे सकाळी उठून पूजाअर्चा करणे, आपापल्या धर्माप्रमाणे उपासतापास करणे आणि प्रत्यक्ष व्यवसाय वा काम करताना बिनदिक्कत वाटेल ते करून पैसे करणे. असे करण्यात आपण काही गैर करतो आहोत असे त्यांच्या मनातही येत नाही. त्यामुळे आपण जागरूक राहून अशा लोकांकडून न फसणे, हे महत्त्वाचे. समजा, सगळे करूनदेखील फसलो, तर त्यांना दाद देणे एवढेच आपल्या हाती उरते. आपण एकमेकांना फसवून खात नाही; पण एकमेकांचे पैसे खातो.
आपण सारेजण काही ना काही काम करत असतो. त्यानिमित्त लोक आपल्याकडे येऊन आपला सल्ला मागतात. मग तो सल्ला सरकारी कामांत असो, पैसे गुंतवण्याचा असो वा खरेदी-विक्रीबाबत असो. आपल्याला जास्त माहिती आहे असे वाटल्याने लोक विश्वासाने आपल्याकडे येतात. आपण यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. ती अशी : एका गावात एक तरुण मुलगी आणि तिची आई अशा दोघी राहत असतात. तरुणी डोंगरदऱ्या पालथ्या घालून मौल्यवान खडय़ांचा शोध घेण्याचे काम करत असते. तिचे काम धोकादायक असल्याने तिला आपल्याला काही झाले तर आईचे काय होईल, अशी काळजी वाटे. त्यासाठी ती प्रत्येक वेळी मोहिमेवरून परत आली की एक खडा आईला  द्यायची. आईच्या पुरचुंडीत असे बरेच खडे जमलेले असतात. एक दिवस न व्हावे ते होते. ती मुलगी कडय़ावरून कोसळते आणि मरते. आईवर भयानक आघात होतो. काही दिवस जातात. तिला पैशाची विवंचना होऊ लागते. अचानक तिला त्या पुरचुंडीची आठवण  होते. पुरचुंडी घेऊन ती एका जवाहिऱ्याकडे जाते आणि त्या खडय़ांचे होतील तेवढे पैसे द्या असे सांगते. तो आपल्या मित्राशी बोलत बसलेला असतो. बोलत बोलत तो ती पुरचुंडी उघडतो आणि थक्क होतो. त्यातले काही खडे ही रत्ने असतात. तो त्या म्हातारीला म्हणतो, 'आजी, हे फार म्हणजे फारच मौल्यवान आहेत. तुम्ही असे करा- तुम्हाला लागतील तेवढे पैसे तुम्ही आयुष्यभर माझ्याकडून घेत जा. तुम्हाला घर वगैरे घ्यायचे असेल किंवा काय वाट्टेल ते घ्यायचे असेल तर मला सांगा. मी देईन.' म्हातारीची कुवतच नसते ते समजण्याची. ती म्हणते, 'शंभर रुपये दे.' जवाहिर तिला पैसे देतो. ती निघून जाते. त्याचा मित्र म्हणतो, 'हे मूर्खासारखे काय केलेस? तिला नाही अक्कल. शंभर रुपये देऊन फुटवायचे होतेस.' जवाहिर म्हणतो, 'तिला काही कळत नव्हते म्हणूनच माझी जबाबदारी वाढली. मी जर तिला नीट नाही सांगितले, तर कोण सांगेल? मी जर सगळे पैसे तिला दिले असते तर ते चोरापोरी गेले असते आणि ती पुन्हा कफल्लक झाली असती. आता मी तिला आयुष्यभर पैसे देईन. यातच आमच्या दोघांचा फायदा आहे.' व्यवहार झाल्यावर दोन्ही बाजूंना समाधान झाले तर तो व्यवहार योग्य झाला. कारण नुसता व्यवहारच नाही झाला; तर दोघेजण मित्र झाले. मैत्रीत व्यवहार ठेवू नये, पण व्यवहारातून मित्र जोडावे.
एकदा भगवान बुद्धांना कुणी- सत्य म्हणजे काय, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माणूस अतिशय आजारी पडतो. अनेक वैद्य, हकीम येतात आणि हा केवळ काही दिवसांचाच सोबती आहे असे सांगून निघून जातात. प्रत्येकजण आपल्या मगदुराप्रमाणे किती दिवस जगणार, ते सांगतो. रुग्ण आणखीनच खचत जातो. एके दिवशी एक वेगळाच वैद्य येतो. तो आल्या आल्या त्याची नाडीपरीक्षा करून सांगतो की, त्याला काहीही आजार नाही. तो दोन दिवसांत बरा होणार आहे. चल, ऊठ रे! असे म्हणून तो त्याला उठवतो. इकडे-तिकडे चालवतो. काही सोप्या सूचना देतो. तो माणूस खरंच बरा होतो. सगळीकडे आनंदीआनंद होतो. ज्याचा उपयोग होतो, ते सत्य. शेवटचा वैद्य कदाचित खोटेही बोलत असेल. पण रुग्ण बरा झाला, हे महत्त्वाचे.'
किती वाजले, या प्रश्नाला सतत वेगळे उत्तर मिळते. तसेच सत्याचे आहे. सत्य म्हणजे काय, याला सतत वेगळे उत्तर मिळणार, हे सत्य आहे. त्याचे काहीही प्रयोग करा. जगामध्ये असत्य आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे सत्याचा शोध घेण्यापेक्षा योग्य गोष्टीचा उपयोग घेणे, हे महत्त्वाचे. जी गोष्ट केल्याने आपली ऊर्जा वाढते ती गोष्ट योग्य, एवढेच लक्षात ठेवायचे. खोटी दु:खे आणि खोटय़ा काळज्या मागे लावून घेऊ नये. समाजातल्या एका माणसाची ऊर्जा वाढली की समाजाची ऊर्जादेखील किंचित वाढते. समाजातल्या एका माणसाची ऊर्जा कमी झाली की समाजाची ऊर्जा किंचित कमी होते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि भीती यांचा उद्रेक झाल्यामुळे वैयक्तिक ऊर्जा कमी होत जाते. आणि समाजाची हानी होते, ती वेगळीच.
आपण सर्व वरील भावनांनी कमी-जास्त प्रमाणात ग्रस्त होत असतो. सर्वप्रथम आपण जेव्हा असे ग्रस्त होतो तेव्हा आपले शरीर कसे बदलते, हे पाहायला शिकावे. शरीर-मनात झालेले बदल नीट पाहता येणे, ही पहिली पायरी. नंतर हे बदल नियंत्रित करता येणे, ही दुसरी पायरी. वरील गोष्टींनी ग्रस्त होण्याआधीच कळणे, ही तिसरी पायरी. तर वरील गोष्टींशी कधीही संबंध न येणे, ही चौथी पायरी. या पायरीवर आल्यावर ऊर्जेचा ऱ्हास होत नाही व त्यानंतरच आपल्या हातून काही बऱ्या गोष्टी होतात. स्वत:ला मदत न करता जगाला मदत करणे म्हणजे आपली चड्डी काढून दुसऱ्याला देण्यासारखे असते. एक नागवा राहतोच.
आयुष्य मजेत जायला वाचन, संगीत, प्रवास, आवडत्या व्यक्तीचा सहवास, हसणे, हसवणे, आचरटासारखे वागणे अशा अनेक गोष्टी असतात. शेवटी कुणाला कशात मजा येईल हे ज्याचे त्यालाच कळणार. ज्यामुळे इतर कुणाला त्रास न होता आपल्या शरीर-मनाचे संवर्धन होईल अशी मजा ही खरी मजा. ज्यामुळे परिसर वा वातावरण गलिच्छ होईल, भयानक आवाज होईल, आपल्या किंवा इतर कुणाच्या शरीर-मनास इजा होईल अशा गोष्टी या मजेदार नसतात, हे कळायला समाजमनाला वेळ लागतो. त्यामुळे त्याची घाई करून चालत नाही. खरे म्हणाल तर नुसते असणे, याची आणि यातच मजा यायला लागली की उत्सवाचे ढोल बडवायला लागत नाहीत. कुठली व्यसने करावी लागत नाहीत. कुणाच्या मागे लागायला लागत नाही. सारे विश्व अनुरक्त स्त्रीप्रमाणे आपले रहस्य खुले करू लागते.
सर्व सुखात असोत. सर्वाना ज्ञान होवो. सर्वाना मार्ग सापडो. आणि या देशाबरोबर इतर देशांतील सर्व जीवजंतू मांगल्याकडे वाटचाल करोत अशी सर्वाना इच्छा होवो, ही इच्छा.               

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व