शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

सांगा कसे जगायचे

रॅन्डी पॉश या लेखकाच्या द लास्ट लेक्चरया गाजलेल्या पुस्तकाचे, ‘अखेरचे व्याख्यानहे मराठी भाषांतरही लोकप्रिय ठरले आहे. हातात पडलेले पत्ते बदलता येत नसले तरी डाव कसा खेळायचा ते ठरवता येते.रॅन्डीचे हे वाक्य वाचल्यावर क्षणभर राजेश खन्नाच्या आनंदची आठवण होते. कॅन्सरमुळे मृत्यू उंबरठय़ावर आलेला, हे आनंद आणि रॅन्डीमधील मुख्य साम्य. परंतु भविष्य समजल्यानंतर उरलेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या लहानग्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि प्रिय पत्नीसाठी कोणत्या आणि कशा स्मृती मागे ठेवून जायचे, याचे नियोजन करणारा रॅन्डी हा विलक्षण माणूस या पुस्तकात आपल्याला भेटतो. मरणाला सामोरे जाताना त्याच्या मनात उठणाऱ्या अनंत भावभावना, विचार आणि कृती आपल्याला हसवतात, रडवतात आणि अंतर्मुख करतात! मृत्यूचे अटळपण गृहीत धरून उरलेला प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लावता येईल, याचाच विचार लेखक करीत राहतो. लहानपणापासून पाहिलेली स्वप्ने कशी साकारली, कोणामुळे आणि कोणकोणत्या पद्धतीने साकारली, त्यासाठी पालक, शिक्षक, सहकारी यांची कशी मदत झाली याचा आढावा घेतानाच चांगले जीवन जगण्यासाठी काय महत्त्वाचे, याची नोंद रॅन्डी करतो. याही पलीकडे जाऊन स्वत:ची आणि निकटच्या अनेकांची स्वप्ने साकार करण्यात आलेले अनुभव तसेच यशापयशांचीही खास नोंद तो करतो. खजील करणाऱ्या घटना प्रांजळपणे समोर ठेवतो. स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्या सभोवतालच्या माणसांशी संवाद साधण्याची, नाते जोडण्याची हातोटी हा त्याचा मोठाच गुण आहे. प्रत्येकाने स्वप्ने बघावीत, त्यासाठी धडपडावे आणि इतरांनाही त्यांची स्वप्ने बघण्यासाठी, साकारण्यासाठी मदत करावी, त्यांची मदत घ्यावी आणि सर्वानी सृजनशीलतेचा आनंद घ्यावा हीच भावना त्यामागे दिसते. वास्तवातील जगामध्ये अनेक दु:खे असतीलही पण जग बदलण्याचा अभिनिवेश न करता भासमान वास्तवात स्वत:च्या कल्पनांना मुक्त वाव देत वास्तवात त्यासाठी लागणारे अफाट कष्ट करून नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या अनेक युक्त्या तो जाताजाता सांगतो. भविष्यामध्ये आपल्या मुलांची स्वप्ने साकार करायला आपण नसणार, याचे वाईट वाटत असतानाही त्यांना मदत करणारे असंख्य लोक असतील, याचा त्याला विश्वास वाटतो व पैसे फारसे महत्त्वाचेही नाहीत हे तो जाणतो; पैशांपेक्षाही मौल्यवान अशा अनेक प्रकारच्या संपत्तीचा साठा जमा करण्याचे, त्या जपून ठेवण्याचे नाना मार्गही तो सांगतो.
मरणाची चाहूल लागल्यावर आपले विचार आणि भावना सार्वजनिक भाषणातून व्यक्त करण्याची संधी रॅन्डीला मिळाली आणि त्याने या संधीचे अक्षरश: सोने केले. तुम्ही लवकरच मरणार आहात आणि त्यापूर्वी तुम्हाला आयुष्यात कशाकशाचे महत्त्व वाटते, कोणते विचार सहकाऱ्यांबरोबर वाटून घ्यावेसे वाटतात, याबद्दल एका प्राध्यापकाचे भाषण अमेरिकेतील कार्नेजी विद्यापीठात दरवर्षी आयोजित केले जाते. या भाषणासाठी आमंत्रण मिळणे हा प्राध्यापकांसाठी मोठाच सन्मान समजला जातो. मात्र या विद्यापीठातील रॅन्डी पॉश या संगणकशास्त्राच्या प्राध्यापकाला २००७ सालचे व्याख्यान द्यायला निमंत्रित केले तेव्हा त्याला मात्र आपल्या मृत्यूची कल्पना करण्याचे संकट वाटले नाही कारण तो खरोखरच मृत्यूची गडद होणारी सावली बरोबर घेऊन वावरत होता. तीन ते सहा महिन्याचे आयुष्य त्याच्याजवळ होते. अशा वेळी आपल्या पाच, तीन आणि दीम्ड वर्षांच्या बछडय़ांबरोबर, केवळ आठ वर्षांचे सहजीवन मिळालेल्या सहचरीबरोबर उर्वरित वेळ घालवावा ही इच्छा असणे स्वाभाविक होते. परंतु आजारपणातही काही महिने अतिशय मेहनत घेऊन रॅन्डीने हे भाषण तयार केले आणि गच्च भरून वाहणाऱ्या सभागृहातील श्रोत्यांपुढे सादर केले. विद्यापीठाने त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिग करून ते नेटवर टाकले आणि अक्षरश: जगभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ते पाहिले, ऐकले. याच भाषणाचे संदर्भ घेऊन रॅन्डीने जेफ्री झास्लोव्ह या पत्रकाराची मदत घेऊन साकार केलेले हे विलक्षण पुस्तक.
या भाषणासाठी रॅन्डीने निवडलेला विषय आणि त्याचे शीर्षक आहे. बालपणाची स्वप्ने खरोखरी साकारताना’-'Really Achieving Your Childhood Dreams' हे शीर्षकच आपल्याला सांगते की भाषण आणि पुस्तक मृत्यूबद्दल नाही तर जगण्याबद्दलचे आहे. पहिल्याच प्रकरणाचे नाव आहे, ‘अ‍ॅन इन्जर्ड लायन स्टिल वॉन्टस् रोअर’. जखमी सिंहाला अजूनही डरकाळी मारायची आहे. रॅन्डीचा स्वप्नप्रवास बालपणापासून सुरू होतो. आपल्याला चांगल्या आईवडिलांची लॉटरी लागली हे नमूद करतो तेव्हा जगातील असंख्य मुलांना ती लागत नाही, याचे भान त्याच्याजवळ दिसते. रॅन्डीच्या चित्र-विचित्र रंगीबेरंगी स्वप्नांना आईवडिलांनी फुलवायला मदत केली. बैठय़ा घरामध्ये राहताना उंच इमारतीचे स्वप्न पाहणारा रॅन्डी खोलीचे दार लिफ्टसारखे रंगवतो. बाजूला लिफ्टचे बटन आणि दारावर वर सहावा मजला असे रंगवून वर्तमानातच तो आपले स्वप्न प्रत्यक्षात आणतो! अशासारख्या प्रसंगी शिक्षकांची, सहकाऱ्यांची अतिशय कमी शब्दांमध्ये रेखाटलेली व्यक्तिमत्त्वे पुस्तकात भेटतात. त्या सर्वाचा लेखक ऋणी आहे.
यशापयशाची जबाबदारीही तो मानतो. नशीब नावाच्या गोष्टीवर त्याचा विश्वास आहे पण त्याची नशिबाची व्याख्या दैववादी नाही तर कर्मवादी आहे. संधी मिळताच आपल्या सुसज्जतेचे स्वप्नपूर्तीमध्ये झालेले (किंवा न झालेले) रूपांतर म्हणजे नशीब! त्यामुळे सतत दक्ष, कार्यक्षम राहणे महत्त्वाचे आहे हे तो जाणतो. मानवी बुद्धीला सतत धारदार करण्याचा, प्रयत्नवादी मंत्र तो सतत घोकत राहतो. दूरदृष्टीने पर्यायी नियोजन त्याला महत्त्वाचे वाटते. दैववाद नाकारून भव्य स्वप्ने बघण्याची अमेरिकन परंपरा त्याच्यामध्ये आपसूक दिसते. बराक ओबामांनी पाहिलेल्या मानवजातीच्या भविष्याच्या स्वप्नाच्या जातीचेच रॅन्डीचे हे अमेरिकन स्वप्न आहे. तुलनेने आपण भारतीय पारंपरिक मानसिकता जपतो आणि मुलांच्या सहजस्वप्नांना दूर ठेवत पठडीतले संस्कार करतो. हे पुस्तक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, कार्यमग्नता, स्फूर्ती देणारा एक आनंदाचा झरा आहे.
सुलक्षणा महाजन
sulakshana.mahajan@gmail.com


3 comments:

Pravin 1 November 2009 at 09:44  

Here is the link to 'The Last Lecture'
http://www.youtube.com/watch?v=ji5_MqicxSo
It's over an hour but worth spending that hour watching this lecture.

Gurunath Kajalkar 2 November 2009 at 11:49  

very inspirational book and video also.

I enjoyed this book for 5 to 6 times, i like every chapter and his experience.

thank for short article.

Narendra prabhu 2 November 2009 at 16:04  

गुरूनाथ, मी सध्या हे पुस्तक वाचतो आहे. खरच कसं जगावं माणसाने हे कळतं. आपल्या समस्या किती छोट्या असतात नाही?

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व