शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

थर्ड आय : .. आणि ती २१ वर्षानी रडली!


३ एप्रिल १९८८! शरयूच्या पोटी एका गोंडस बाळानं जन्म घेतला. जन्मत:च हसरा चेहरा आणि ते सशासारखं गोंडस रूप पाहून नागेश आणि शरयू घाडींचा आनंद गगनात मावेना. पण काही दिवसांतच असं लक्षात आलं की, देव या गोंडस बाळाला पाठीचा कणाच द्यायला विसरलाय. पण शरयू-नागेशनं देवाची ही चूक तशीच स्वीकारली आणि विधात्याने दिलेला हा प्रसादआहे असं मानून या बाळाला तेच नाव दिलं- प्रसाद! प्रसाद नागेश घाडी!!

या रविवारी ६ सप्टेंबरला नक्षत्राचे देणेमधल्या आता खेळा नाचाया लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं झी मराठी चॅनलवर पुन:प्रक्षेपण झालं. व्हील चेअरमध्ये स्वत:च्या शरीराचं मुटकुळं करून बसलेला प्रसाद घाडीगात होता- कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा! सहा वर्षानी पुन्हा एकदा खूप रसिकांनी प्रसादच्या घरी कौतुकाचे फोन केले. त्या संध्याकाळी/रात्री त्याचा फोन सतत बिझी होता आणि त्याच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. डोळे भरून आले, पण तिने हसतमुखाने ते अश्रू ढळू दिले नाहीत.
सारेगमप लिटील चॅम्पसारखा सुंदर कार्यक्रम सादर केल्यावर आणि यशस्वी केल्यावरही इतक्या वर्षानी आपल्या मुलाचा सहभाग असलेला कार्यक्रम नेमका आज पुन:प्रक्षेपित का करीत असतील? खरं तर त्याच दिवशी दुसऱ्या एका चॅनलवर पाटी फुटलीहा तसाच लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम सादर होत होता. कदाचित दोन चॅनल्समधील व्यावसायिक स्पर्धेमुळे त्याच दिवशी, त्याच वेळी आता खेळा नाचापुन:प्रक्षेपित केलं असेल, त्यात वेगळं काय? पण तरीही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रसादही डोळे भरून तो आपलाच जुना कार्यक्रम बघत होता आणि रसिकांचे कौतुकाचे फोन स्वीकारत होता.
देव त्याला कणाद्यायला विसरला आणि प्रसादला जन्मत:च रस्र््रल्लंट४२ू४ं१ अ३१स्र्ँ८ या असाध्य बाधीनं जखडलं. कुठलीही शारीरिक हालचाल करायची असली तरी त्याच्या दुसऱ्याच्या आधाराची गरज भासायची. ताठ मानेनं बसण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या काखेत हात घालून, त्याच्या शरीराची वर-खाली हालचाल करून पाठीचे मणके एकात एक घट्ट बसले आहेत याची खात्री करून, पाठीचा कणा ताठ करून मगच त्याला बसवावं लागायचं. पण आहे त्या व्याधीवर मात करून आसवं गाळत न बसता, आयुष्य सुंदरपणे जगायची उमेद त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यात निर्माण केली.
विधात्यानं जरी त्याच्या नशिबात असं दुसऱ्याच्या मदतीनंच जगायचं आयुष्य दिलं असलं तरी त्याचे आभारच मानायला हवेत, अशी शिकवण त्याची आई शरयू त्याला देत राहिली. त्याला श्लोक, अथर्वशीर्ष, रामरक्षा शिकवत राहिली. लहानपणापासून गणपतीच्या आरत्या, बडबड गीतं म्हणताना, त्याचा आवाज गोड आहे याची जाणीव होऊ लागली. मग या छोटय़ाशा जीवाला गाण्यासाठी दीर्घ श्वास मिळावा म्हणून कोणीतरी मेणबत्ती पेटवून ती फुंकरेने विझवायचा व्यायाम सुचवला. फुंकरेने ज्योत विझवायच्या व्यायामाबरोबरच प्रसादच्या आई-वडिलांनी त्याला आपल्या दु:खावरच फुंकर मारायला शिकवलं.
प्रसादची आई शरयू, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका, तर वडील नागेश नायर हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक! सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात असते तशी बेताचीच परिस्थिती. प्रसादच्या या अवस्थेला तो स्वत: जबाबदार नाही, मग जीवनाच्या आनंदापासून वंचित राहायची शिक्षा त्याने का भोगायची? असा विचार त्याच्या जन्मदात्यांनी केला. मग दोघांनी हे दैवी चॅलेन्जस्वीकारलं.
प्रसाद अपंगांच्या शाळेत जाऊ लागला. त्याला सतत कोणाच्या तरी आधाराची गरज भासत असे म्हणून नागेश दिवसभर त्याला साथ देऊन, रात्रपाळीची सुरक्षा रक्षकाची नोकरी करू लागले. शरयूनं त्याच्यातल्या उपजत कलेला, चित्रकलेला आणि गाण्याला प्रश्नेत्साहन दिलं. प्रदीप जोशींकडे तो शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागला. चौपाटी समोरच्या बालभवनमध्ये चित्रकलांच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. चित्र काढता काढता, गाणी गाता गाता, छोटय़ा-छोटय़ा कविता करता करता, त्याच्या शिक्षिका आईने, त्याच्यात ऐकण्याची आवडनिर्माण केली. हातात पुस्तक धरून सलग वाचता येत नाही म्हणून त्याची आई त्याला अभ्यासाची व इतर अवांतर पुस्तके वाचून दाखवत होती. अभ्यासाबरोबरच तो स्वामी, श्रीमानयोगी, शिवचरित्र यासारखं पुस्तके ऐकत बसत असे. त्याच्या या सर्व कलागुणांची दखल घेतली गेली आणि प्रसादला २०००-२००१चा बालश्रीहा राष्ट्रपती पुरस्कारमिळाला.
सातवीपर्यंत अपंगांच्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाने, आता ती शाळा सोडून सर्वसामान्यांच्याबरोबरीनं शिकण्या-जगण्याचा आनंद अनुभवावा अशी त्याच्या जन्मदात्यांची इच्छा होती. जिद्द आणि प्रबल इच्छेच्या जोरावर त्याने सर्वसामान्यांच्या शाळेत प्रवेश मिळवला. सलग दोन - तीन तास हातात पेन्सिल धरू न शकणाऱ्या प्रसादने लेखनिकाच्या मदतीने दहावी शालांत परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. पण सातवीनंतर अपंगांची शाळा सोडल्यावर, त्याने तोपर्यंत पटकावलेली अनेक बक्षिसे मात्र त्याच्या शाळेने त्याला दिली नाहीत. पण ते दु:ख त्याने सहज पचवलं आणि त्याच वर्षी २००३ मध्ये तो सर्व बालगायकांबरोबर नक्षत्रांचे देणेमध्ये सहभागी झाला. केवळ दोन गाणी गाऊन हा लिटल चॅम्पअनेक रसिकांच्या मनात जाऊन बसला. या कार्यक्रमानंतर मी चतुरामासिकात प्रसादवर लिहिलेला जिद्दीचे गाणेहा लेख वाचून वाचकांकडून आलेला प्रचंड प्रतिसाद पाहून प्रसाद खूष झाला होता.
त्याच्या मनाची उमेद अशी वाढत असताना नियतीने त्याची शारीरिक असहाय्यता वाढवायला सुरुवात केली; आणि शालांत परीक्षेत ८६% गुण मिळवूनसुद्धा पुढे शिक्षण न घेता गाणी गात, चित्र काढत पुढील आयुष्याचा, उर्वरित आयुष्याचा आनंद उपभोगायचा निर्णय त्याने घेतला. एक उत्तम गायक व्हावं, स्वत:ची कंपोझिशन्स बांधावीत हे त्याचं स्वप्न होतं. मग प्रसादला स्वत: एकटय़ाने गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम करावा असं वाटू लागलं, अडचण होती ती फक्त त्याच्या सलग दोन-तीन तास बसण्याची! पण संगीतकार कौशल इनामदारच्या साथीने त्याने ते साध्य केलं आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विजय देसाईंमुळे, प्रसादच्या एकटय़ाच्या गाण्याचा जिद्दीचे गाणेहा सलग तीन तासांचा कार्यक्रम सादर झाला. झी मराठीने त्याच कार्यक्रमात आता खेळा नाचाही नक्षत्रांचे देणे मालिकेतली डीव्हीडी रिलीज केली. झीच्या कार्यक्रमामुळे आणि चतुरातल्या त्या लेखानंतर प्रसाद जगभरात असंख्य रसिकांच्या मनात जाऊन बसला.
लहानपणी इतिहासाच्या अभ्यासातल्या गडांची प्रत्यक्ष माहिती व्हावी. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला खांद्यावर बसवून प्रतापगडसुद्धा चढून पार केला. केसरी ट्रॅव्हल्सच्या विशेष सहकार्याने बेंगलोर, म्हैसूरला नेऊन निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची प्रत्यक्ष ओळख करून दिली आणि त्यानंतर मात्र षोडषवर्षीय प्रसादने आपल्या गाण्याच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर, दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचं सन्माननीय आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या आई-वडिलांनाही परदेशवारीचा आनंद उपभोगू दिला.
हळूहळू प्रसादचं वय वाढत होतं. तो वयात यायला लागला होता. पण शरीर मात्र झिजू लागलं होतं. स्नायूंचाच आजार, त्यामुळे ते हळूहळू क्षीण होऊ लागलं होतं. शरीराची हालचाल मंदावू लागली, अनेक बंधनं आडवी येऊ लागली पण देवानं दिलेला हा प्रसादम्हणजे आनंदच असा मनाशी पक्का निश्चय केलेले जन्मदाते आणि स्वत:ची जिद्द या जोरावर त्याचा दिनक्रम चालूच राहिला. जगातलं उत्तमोत्तम वाचन, आईच्या मुखातून ऐकणं चालूच राहिलं. शरीर साथ देत नसताना, जन्मत:च एका असाध्य व्याधीनं जखडलं असतानाही, घडत राहिलेल्या कलेच्या साधनेमुळे रु. ५०,००० चा मानाचा नॅशनल अ‍ॅबिलिटीपुरस्कारही पटकावला.
प्रसादच्या या खडतर प्रवासात घाडी कुटुंबीयांना जसे भले अनुभव आले तसेच अनेक बुरे अनुभवही निश्चितच आले. प्रसादच्या कलागुणांनी आणि शरयू नागेशच्या हसतहसत दु:ख स्वीकारण्याच्या जिद्दीने प्रभावित होऊन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्याआधीच्या राष्ट्रपतींनी सन्मान केलेल्या या बालश्रीला पुन्हा एकदा भेटीसाठी निमंत्रण पाठवलं. त्याच्या एका चित्राचा स्वीकार केला. मात्र सर्वसामान्यांच्या आणि आप्तेष्टांच्या काही स्नेहसंमेलनांपासून मात्र शरयू वंचित राहिली. डोहाळजेवण, बारसं, वाढदिवस अशा काही कार्यक्रमांना काही लोक, तिला टाळू लागले, पण ती नाऊमेद झाली नाही. आपलं दु:ख पचवायला तिने वेळप्रसंगी कलेची आराधना केली. वयाची चाळिशी उलटली तरी कथ्थक नृत्याचे धडे घेत तिने आपलं दु:ख नजरेआड केलं. दिवसभर घरात मुलाची सेवा आणि सलग १८ वर्षे रोज रात्री सुरक्षा रक्षकाची चाकरी सांभाळणाऱ्या नागेशने, बाहेरची दुनिया बघायला मजा अनुभवायला मिळत नाही म्हणून, मौजेचा- स्वानंदाचा वाम मार्गस्वीकारून स्वत:चं आयुष्य बरबाद केले नाही, उलट दिवसभर मुलाची सेवा करता करता, घरातच फावल्या वेळात पाळीव माश्यांची देखभाल करण्याचा छंद जोपासला.
प्रसादासाठी जसे त्याने आई-वडील बऱ्याच गोष्टी अ‍ॅडजेस्टकरून जीवनाचा आनंद एकत्रितपणे मिळवत होते; तसाच प्रसादसुद्धा आपल्याला मदत करणाऱ्यांची, आई-वडिलांची धडपड बघून, स्वत:ला अ‍ॅडजेस्टकरू लागला. अनेक इच्छा आकांक्षांना तो मुरड घालू लागला. पण तरीही चुकूनमाकून त्याच्या तोंडून एखादी इच्छा बोलून गेली तरी शरयू-नागेश त्याचा शब्द खाली पडू देत नसत. आणि नशिबही त्याला साथ देत असे. एकदा त्याच्या तोंडून पंचतारांकित ताजमहाल हॉटेल बघायची इच्छा, नकळत व्यक्त झाली. शरयूने कितीही खर्च झाला तरी, प्रसादला तिथे नेण्याचा चंग बांधला, परंतु नशिबानं त्या आधीच त्याला साथ दिली.
काही महिन्यांपूर्वीच प्रसादला डॉ. बात्रा पॉझिटिव्ह हेल्थपुरस्कार जाहीर झाला आणि योगायोगानं त्याचा वितरण समारंभ ताजमहाल हॉटेलमध्येच होता. प्रसादची तब्येत दिवसेंदिवस खालावली होती, पण तरीही आयोजकांच्या सहकार्याने प्रसाद ताजमहाल हॉटेलमध्ये पोहोचला. मृत्युशी झुंज देणाऱ्या प्रसादने, स्ट्रेचरवरच तो पुरस्कार स्वीकारला आणि स्ट्रेचरवरूनच त्याने शेवटचं गाणं तिथे सादर केलं, ‘ये कागजकी कश्ती..
शुक्रवारी चार सप्टेंबरला प्रसादला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं गेलं. पण तो लगेच रविवारी घरी परतला. योगायोगानं त्याच संध्याकाळी झी मराठीने नक्षत्रांचे देणे पुन:प्रक्षेपित केलं. प्रसादने रसिकांचे कौतुकाचे फोन स्वीकारले. आणि शरयूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रसादला पुन्हा सोमवारी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायची पाळी आली. डॉक्टरांनी कउव मध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. प्रसादला मात्र ते नको होतं. त्याला शांतता हवी होती, पण त्याने आई-वडिलांचं ऐकलं. त्यांच्यासाठी त्याने स्वत:ला कउव मध्ये अ‍ॅडजेस्ट केलं. २१ वर्षाच्या प्रसादनं मंगळवारी सकाळी आईला विचारलं, ‘आई, मी आजपर्यंत सगळं अ‍ॅडजेस्ट केलं ना?’ शरयूच्या उत्तरासाठी तो थांबला नाही. ज्या विधात्याने २१ वर्षापूर्वी शरयू पोटी या प्रसादला पदरात ठेवलं, त्याच विधात्याने ऐन अंगारकीच्या दिवशी शरयूकडून प्रसादपरत घेतला. ती कोलमडली. आयुष्यभर अनेक प्रसंगांनी डोळ्यात पाणी तरळलं, पण तिनं कधी अश्रू ढळू दिले नाहीत. पण आज मात्र.. ती २१ वर्षानी रडली!

संजय पेठे , sanjaypethe@yahoo.com


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व