शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

एक होत्या शांताबाई!



डॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०
saleel_kulkarni@yahoo.co.in

शांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..
सर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं! एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.
त्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना?’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.
‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..
‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून
आणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी!’
असं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.
‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.
‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या! मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-
कोकीळ म्हणतो काय करावे?
खोकून बसला पार घसा
कुहुकुहुचे सुंदर गाणे
सांगा आता गाऊ कसा?
म्हणे कोंबडा टी.व्ही. बघता
रात्री गेला वेळ कसा
उशिरा उठलो कुकुच्चकुची
हाक कुणा मी देऊ कसा?
एकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-
‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?’
असं वास्तव त्या लिहून जातात.
मला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.
‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का?’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य!’
एकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला
‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू..’
त्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं!’
एकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे!’
मी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है?’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-
‘जवानी का आलम बडा बेखबर है
दुपट्टे का पल्लू किधर का किधर है
मला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना!’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो!
‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..
काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे
माझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..
मी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का? तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे!’
एका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.
एकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ? चालेल?’ तर मला म्हणाल्या, ‘नको! मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.
त्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गाणी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील!
सोपं, गोड लिहिता लिहिता..
‘मातीची धरती, देह मातीचा वरती
अरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..
अजब सोहळा! माती भिडली आभाळा..’
असं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी
‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,
मी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.
गोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.
शांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’
शांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई! याल ना!

साभार लोकसत्ता

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व